मुंबई – रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ भाजपा आमदार राम कदम यांचा पुढाकार कायम आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक केलेल्या पोलिसांवर कारवाई करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. यासाठी मागील आठवड्यात राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं, त्याचसोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली होती.
आज आमदार राम कदम हुतात्मा चौक ते मंत्रालयापर्यंत पायी जाणार असून त्याठिकाणी गृहमंत्री अनिल देशमुखांची भेट घेणार आहेत. अर्णब गोस्वामी यांची सुटका करा आणि अटक केलेल्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी राम कदम गृहमंत्र्यांना करणार आहेत. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते सध्या आमने-सामने आलेले आहेत. गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भाजपाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे.
अर्णब गोस्वामी यांना जेलमध्ये कोणालाही भेटता येत नाही असं सांगितलं जात होतं, त्यावर राम कदम यांनी थेट राज्य सरकारला आव्हान दिलं होतं. मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जात आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा, अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला धोका आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर त्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना देशातील जनता कधीही माफ करणार नाही. तुम्ही जबरदस्तीने आणीबाणी लादली आहे. आता मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहाकडे निघालो आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा, असं राम कदम यांनी म्हटलं होतं.
अर्णब गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी
अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार अर्णब गोस्वामी यांची रविवारी अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मुंबईतील राहत्या घरातून अटक केली होती. तिथून त्यांना रायगडमध्ये नेण्यात आले होते. तिथे न्यायालयात हजर केले असतान त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तेव्हापासून अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान, माझ्या जीवाला धोका आहे. अटकेत असताना मला मारहाण करण्यात आली. मला माझ्या वकिलांसोबत बोलू दिले जात नाही आहे, असा आरोप रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी केला होता.
राम कदमांचे मंत्रालयासमोर आंदोलन
महाराष्ट्र सरकारनं पुकारलेल्या अघोषित आणीबाणीविरोधात लाक्षणिक उपोषणाला बसलो आहे असं सांगत राम कदम यांनी मागील आठवड्यात मंत्रालयाच्या गेटसमोर आंदोलन केले होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं आहे त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, ज्या पद्धतीने अर्णब गोस्वामींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या घटकाविरोधात अघोषित आणीबाणी पुकारता येणार नाही. त्यामुळे सरकारविरोधात हे लाक्षणिक उपोषण आहे असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला होता.
मंत्रालयासमोर आंदोलन करणारे भाजपा आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात