मुंबईशिवसेनेनं राम मंदिरासाठी घेण्यात येणाऱ्या वर्गणीवरुन भाजपवर टीका केल्यानंतर आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "राम मंदिर आंदोलनात ज्यांनी केवळ राजकीय घुसखोरी केली त्यांनाच रामवर्गणीची पोटदुखी होतेय", असा घणाघात शेलार यांनी केला आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये राम मंदिराच्या निर्माणासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून जमा केल्या जाणाऱ्या वर्गणीवरुन भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. "राम मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे. वर्गणी जमा करण्याच्याचे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे", असा आरोप शिवसेनेने केला आहे.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करुन यावर शिवसेनेला टोला लगावला आहे. "राम जन्मभूमी आंदोलन म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, वंदनीय अशोक सिंघल, मोरोपंत पिंगळे, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, महंत रामचंद्र परमहंस यांच्यासह कोठारी बंधु ते कारसेवक किती नावे संघर्षाची, त्यागाची, समर्पित आयुष्याची घ्यावीत", असं ट्विट शेलार यांनी केलं.
त्यानंतर आणखी एका ट्विटमध्ये ते म्हणतात की, "या आंदोलनात ज्यांची केवळ होती राजकीय घुसखोरी, त्यांनाच झाली होती राम मंदिराच्या भूमी पुजनाची पोटदुखी आणि त्यांनाच आता डोळ्यात खूपतेय "रामवर्गणी". राम भक्त हो! मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवण्यांना स्वत:च्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे?", असा जोरदार टोला हाणला आहे.