बंगळुरु - सध्या सोशल मीडियात भाजपा आमदाराने एका महिला नगरसेवकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. हा व्हिडीओ कर्नाटकातील असल्याचं कळतंय, तेरदळ येथील महिला नगरसेवकाला मारहाण करतानाचा भाजपा आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजपावर चहुबाजुने टीका होऊ लागली आहे.
महालिंगपुरा नगरपरिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेण्यापासून रोखण्यासाठी भाजपा आमदार सिद्धू सावदी यांनी त्यांच्याच पक्षाच्या महिला नगरसेवकाला मारहाण केली असा आरोप आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ही घटना ९ नोव्हेंबर रोजी घडली. मात्र, या घटनेसाठी सावदी यांनी कॉंग्रेसला जबाबदार धरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या नगरसेविक सविता हुरकादली, चांदनी नायक आणि गोदावरी बाट यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितले होते की, त्यांनाही अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची संधी द्यावी. मात्र, पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर नगरसेविका सविता हुरकादली यांच्यावर काँग्रेसला मदत केल्याचा आरोप करत भाजपा आमदाराने त्यांना मारहाण केली, त्यावेळी पोलीस व अन्य कोणीही मदत केली नसल्याचा आरोप नगरसेविका सविता हरकादली यांनी केला आहे.
व्हायरल व्हिडिओत काही नेते नगरसेविकेला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांना मारहाण करणाऱ्या नेत्यांचे पाठीमागे पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. भाजपाचे आमदार सिद्धू सावदी यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना संपूर्ण आरोप कॉग्रेसच्या माथी मारला आहे. ते म्हणाले की, त्या दिवशी झालेल्या गदारोळात कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी विनयभंग करून त्यांना मारहाण केली. ही कॉंग्रेसची संस्कृती आहे आणि ते त्यांच्यासाठी नवीन नाही असं सावदी यांनी सांगितले.