मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिकमध्ये भेट घेतली होती. आता माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे राज ठाकरे यांना भेटणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती होणार, अशी चर्चा असताना या भेटींना महत्त्व आले आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेणार का?, असा प्रश्न पाटील यांना पूर्वी केला असता त्यांनी उत्तर भारतीयांबाबत भूमिका राज यांना स्पष्ट करावी लागेल, असे विधान केले होते. नाशिकमध्ये झालेल्या दोघांच्या भेटीतही परप्रांतीयांचा विषय निघाला होता आणि या बाबतची आपली भूमिका स्पष्ट करणाऱ्या काही क्लिप्स आपण पाठवू, असे राज यांनी नाशिकच्या भेटीत पाटील यांना सांगितले होते. त्यानुसार या क्लिप्स राज यांनी पाटील यांच्याकडे पाठविल्या आहेत. या क्लिप्सचा अभ्यास आपण करणार आहोत, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
आता सुधीर मुनगंटीवार हे राज यांना भेटणार आहेत. राज यांचा मला फोन आला होता, आम्ही लवकरच भेटू. भाजप आणि मनसेची युती झाली तर त्यात गैर काय? समविचारी पक्ष एकत्र येत असतील तर त्यात गैर काय? भविष्यात काँग्रेस आणि भाजप सोडून कोणीही एकत्र येऊ शकतो, असे मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.