दोन दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी राजकारणातून सन्यास घेत असल्याची तसेच खासदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. समाजाची सेवा करण्यासाठी राजकारणात राहण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले होते. तसेच भाजपाच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यांनी दत्तक घेतलेल्या गावानेच त्यांना हातचा आरसा दाखविला आहे. (BJP MP Babul Supriyo Adopted siddhbadi village; villagers head shaved after resignation)
एकीकडे भाजपाकडूनबाबुल सुप्रियो यांना समजाविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे त्यांनी दत्तक घेतलेल्या गावच्या रहिवाशांनी मुंडन करण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बर्दवान जिल्ह्य़ातील सालानपूर ब्लॉकमध्ये देंदुआ पंचायतीच्या सिद्धबाडी गाव बाबुल सुप्रियो यांनी मोदींच्या घोषणेनुसार दत्तक घेतले होते. सुप्रियो यांनी सोलार लाईट, रस्ते आणि सबमर्सिबल पंपासह अनेक गोष्टी करण्याचे आश्वासन दिले होते. या गोष्टी सोडता अन्य काहीच त्यांनी केले नसल्याचा आरोप गाववाल्यांनी केला आहे. आम्ही राजकारणाचे शिकार झालो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
काही ग्रामस्थांनी सांगितले की, बाबुल सुप्रियो यांनी या गावात एक हॉस्पिटल, एक मोठी शाळा बनविण्याची घोषणा केली होती. मात्र, दोनदा खासदार झाले तरीदेखील काहीच केले नाही, पुढेही काही होणार नाही.
यावरून देखील राजकीय धुळवड सुरु झाली आहे. भाजपाचे गावातील नेते तीर्थ सेन यांनी सांगितले की, रस्ते, गटारे, शौचालये तसेच महिलांसाठी हस्तशिल्प प्रशिक्षण, पुरुषांसाठी मच्छी पालन आदी सुविधा दिल्या आहेत. तरीदेखील काही लोक काहीच केले नसल्याचे सांगत आहेत. यामध्ये राजकीय हेतू लपलेला आहे.