नवी दिल्ली – कंगना राणौत प्रकरण आणि माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा मुद्दा यावरुन राज्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पेटला आहे. यात भाजपाने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात मोर्चा उघडला आहे. भाजपा शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वात राज्यसभा सदस्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. एचएल दत्तू यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत भाजपा खासदारांनी राज्यातील ८ घटनांचा हवाला देत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत.
राज्यसभेचे सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वात राज्यसभेचे खासदार भागवत कराड आणि डॉ. विकास महात्मे यांनी आयोगाला सांगितले की, डिसेंबर २०१९ पासून राज्यात मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात लिहिणाऱ्यांवर अत्याचार केले जात आहेत.
२३ डिसेंबर २०१९ रोजी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात हिरामन तिवारी नावाच्या व्यक्तीने भाष्य केले, तर सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीवर हल्ला करुन जबरदस्तीने त्याचे मुंडन करण्यात आले. २६ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाकडून फी वाढवल्यामुळे त्याचा विरोध करणाऱ्यांना मारहाण, पालघरमध्ये १६ एप्रिल रोजी झालेल्या दोन साधू प्रकरण, पत्रकारांना ताब्यात घेणे अशा घटनांचा उल्लेखही भाजपा खासदारांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे सरकारमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचं भाजपच्या शिष्टमंडळानं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत सर्व मानवी प्रकरणांची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दोषींवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी भाजपाकडून करण्यात आली आहे.
राज्य मानवाधिकार आयोगाकडून कूपर हॉस्पिटल, मुंबई पोलिसांना दिलासा
सुशांतच्या शवाचे दर्शन घेण्यासाठी 14 जूनला रिया चक्रवर्ती रुग्णालयातील शवागृहात गेली होती. त्याबाबतचे वृत्त विविध वृत्तपत्र व वाहिन्यावरून प्रसारीत करण्यात आले होते. त्यावरून आयोगाने मुंबई पोलीस व रुग्णालयाच्या प्रशासनाला 'सुमोटो' नोटीस बजाविली होती. मात्र दोन्ही यंत्रणानी तिला प्रवेश दिल्याबाबतचे वृत्त फेटाळून लावीत त्याबाबत प्रतिज्ञपत्रक सादर केले. आयोगाने ते मान्य करीत त्यांना क्लिनचिट दिली.
मुंबईत माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात कार्टून फॉरवर्ड केल्यानं कांदिवलीतील एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. मदन शर्मा असं या अधिकाऱ्याचं नाव होतं. शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं एक कार्टून एका व्हॉट्सअप ग्रुपमधून सोसायटीच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड केले. यानंतर कमलेश कदम नावाच्या व्यक्तिचा मला फोन आला. त्यांनी माझं नाव आणि पत्ता विचारला. दुपारी ते लोक बिल्डींग खाली आले त्यांनी मला खाली बोलावलं. बिल्डींगच्या गेटवर ८ ते १० जणांनी मला बेदम मारहाण केली. ही घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर या आरोपींना पोलिसांनी अटक करुन न्यायलयात हजर केले असता त्यांना जामीन मिळाला होता. मात्र या घटनेवरुन भाजपाने ठाकरे सरकारला लक्ष्य केले होते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
बॉलिवूड अन् ड्रग्स प्रकरणात आता अभिनेत्री जया प्रदाची उडी; बच्चन कुटुंबीयांना दिलं थेट आव्हान
भारताविरोधात चीनचा नवा डाव! सीमेवर लाऊड स्पीकर बसवून वाजवतायेत पंजाबी गाणी
तेव्हा मोदी म्हणाले, “मी डिबेटमध्ये येण्यास तयार आहे पण माझ्याकडे गाडी नाही”
पोलीस भरती रद्द होणार?; ठाकरे सरकारचा निर्णय मराठा समाजाला चिथावणी देणारा; छत्रपती संतापले
मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का?; भाजपा आमदाराचा सरकारला सवाल