"काँग्रेसमध्ये घुसमट होत असेल तर भाजपत यावं," खासदाराची सचिन पायलट यांना ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 01:17 PM2021-02-17T13:17:17+5:302021-02-17T13:21:14+5:30
Sachin Pilot : भाजपमध्ये मोकळा श्वास घेण्याची संधी मिळेल, असंही भाजप खासदार म्हणाले.
सचिन पायलट यांनी काँग्रेसमध्ये घुसमट होत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावं आणि मोकळा श्वास घ्यावा अशी ऑफर भाजपचे राज्यसभेचे खासदार किरोडीलाल मीणा यांनी दिली. दौसा येथे मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मोठं वक्तव्य केलं. "सचिन पायलट यांनी संयम राखला पाहिजे. त्यांनी संयम राखला तर पायलट यांना त्यांच्या हक्काच्या सर्व गोष्टी मिळतील," असं मीणा म्हणाले.
"जर पायलट यांची काँग्रेसमध्ये घुसमट होत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावं भाजपमध्ये मोकळा श्वास घेण्याची संधी मिळेल. त्यांच्या हक्काच्या सर्व गोष्टी त्यांना मिळतील," असं मीणा यांनी बोलताना स्पष्ट केलं. "काँग्रेसनं पायलट यांना लाईनमध्ये उभं केलं आहे. ते एक ऊर्जावान नेते आहेत. काँग्रसमध्ये एकमेकांची खेचाखेची अधिक आहे. काँग्रेसची ही लढाई राजस्थानसाठीही घातक आहे. राज्याचा विकासच होत नाहीये," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं उदाहरण दिलं. त्यांनी १९८८ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. परंतु ते आता राष्ट्राध्यक्ष झाल्याचंही त्यांनी नमूद केलं.
वसुंधरा राजे यांच्यावरही भाष्य
किरोडीलाल मीणा यांनी यावेळी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरही भाष्य केलं. "वसुंधरा राजे या जनाधार असलेल्या नेत्या आहेत. त्यांना बाजूला करण्याचा कोणताही प्रश्नच येत नाही. ना त्या पक्षातून बाहेर जाण्याचा विचार करत आहेत. वसुंधरा राजे यांच्याबद्दल माध्यमांमध्ये वृत्त येत आहे. परंतु ते दुर्देवी आहे," असंही मीणा म्हणाले.
वसुंधरा राजे या जनाधार असलेल्या नेत्या आहे. त्यांच्याव्यतिरिक्तही पक्षात अनेक नेते आहेत. त्या पार्टीलाईनवर चालतील आणि ते कधीही तोडणार नाहीत अशी अपेक्षा आपण करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यापूर्वी राज्यात सुरू असलेल्या राजकारणावरून किरोडीमल मीणा यांनी आपला पक्ष स्थापन केला होता. परंतु कालांतरानं ते पुन्हा भाजपमध्ये आले. वसुंधरा राजे मुख्यमंत्रीपदी होत्या त्यावेळी त्यांना राज्यसभेचं खासदार बनवण्यात आलं होतं.