गांधीनगर: भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनसुख वसावा यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. वसावा यांनी कालच खासदारकी सोडत असल्याचं म्हणत राजीनामा दिला होता. मात्र आज त्यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची बैठक घेतल्यानंतर वसावा यांनी गांधीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. 'मी खासदार राहिलो तरच माझ्या पाठीवर आणि मानेवर मोफत उपचार होतील. मी खासदारकीचा राजीनामा दिल्यास मोफत उपचार शक्य नाहीत, असं मला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं. त्यांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला. माझ्या वतीनं स्थानिक कार्यकर्ते आणि पक्षाची यंत्रणा काम करेल, असंदेखील मला वरिष्ठांनी सांगितलं,' अशी माहिती वसावा यांनी दिली. 'माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव मी राजीनामा दिला होता. माझ्या राजीनाम्यामागचं ते एकमेव कारण होतं. त्याचबद्दल मी आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आता वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधल्यानंतर मी माझा राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी खासदार म्हणून माझ्या मतदारसंघातील लोकांची सेवा करत राहीन', असं वसावा यांनी म्हटल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.नर्मदा जिल्ह्यातल्या आदिवासी भागातील १२१ गावांचा समावेश इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये झाल्यानं मी नाराज असल्याची चर्चा होती. पण त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं वसावा यांनी स्पष्ट केलं. 'इको सेन्सेटिव्ह झोनबद्दलचे वाद सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे. त्यामुळे पक्ष किंवा सरकारबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. आदिवासींसाठी सर्वाधिक काम भाजप सरकार करत आहे. याआधीच्या कोणत्याही सरकारनं इतकं काम आदिवासींसाठी केलेलं नाही,' असंही ते पुढे म्हणाले.
...अन् 'त्या' भाजप खासदारानं २४ तासांत राजीनामा मागे घेतला; दिलं 'चकटफू' कारण
By कुणाल गवाणकर | Published: December 30, 2020 4:29 PM