मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मेडिकल कॉलेजच्या मुद्द्यावरून भाजपा नेते नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर नारायण राणेंनीही उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करत खोचक टीका केली आहे. नारायण राणेंनी थेट शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाच्या माध्यमातूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. (bjp mp narayan rane criticizes chief minister uddhav thackeray)
नारायण राणे यांच्या दैनिक ‘प्रहार’मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा छापण्यात आला आहे. त्यामध्ये नारायण राणेंनी म्हटले आहे. "बाळासाहेब, आपण व्यंगचित्र करण्याचे काम कमी केलेत. या प्रश्नास उत्तर देताना बाळासाहेब खंत व्यक्त करत म्हणत, व्यंगचित्र काढण्यासारखे चेहरे राहिले नाहीत. त्या उंचीचे व्यक्तिमत्त्व नजरेस पडत नाही. दर्जेदार विषय गवसत नाहीत. विकृत आणि विदूषक कमी झाले. आज बाळासाहेब असते तर… उत्सुफूर्तपणे कुंचला उचलला असता अन् दिवसागणिक शेकडो व्यंगचित्रं केली असती… अब तो एक ढुंढो हजार मिलते है, और तो घर में ही दो दो बसते है’, असे म्हणत नारायण राणेंनी अशी खोचक टीका नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.
याचबरोबर, बाळासाहेब ठाकरे यांचा व्यंगचित्रं काढतानाचा फोटो छापण्यात आला आहे. त्यावर ‘अब तो एक ढुंढो हजार मिलते है’, असे लिहिले आहे. फोटोला ‘आज बाळासाहेब असते तर…’ अशी कॅप्शन दिली आहे आणि सर्वात शेवटी ‘खा. नारायण राणे यांच्या संग्रहातून’ असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी अनेकदा योजनांची घोषणा केली जाते. नारळ फोडतात आणि पुढे काम होत नाही. पण आपल्या सरकारकडून तसे होणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या नारायण राणेंना टोला लगावला. तसेच, ज्या योजना होणाऱ्या असतात त्याचीच आपण घोषणा करतो. त्यामुळे आता या योजनांचा शुभारंभ झाला आहे. त्या आपण पूर्ण करणार आहोत. या योजना पूर्ण झाल्यानंतर मी स्वत: त्याचं उद्घाटन करण्यासाठी कोकणात येईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.
स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी उघडावी, नारायण राणेंचा पलटवारउद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता नारायण राणेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करुन दाखवावी, अशी खोचक टीका राणे यांनी केली. यासंदर्भात नारायण राणे यांनी टि्विट केले.