नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. मोदी सरकार २.० मध्ये अद्याप तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे अनेक ज्येष्ठ मंत्र्यांकडे अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी कमी करण्यासाठी पुढील दोन दिवसांत मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. शिवसेनेनं भाजपचा हात सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला. यासाठी शिवसेनेनं केंद्रातील मंत्रिपदावर पाणी सोडलं. शिवसेनेनंतर शिरोमणी अकाली दलानंदेखील भाजपची साथ सोडली. त्यामुळे दोन मंत्रिपदं रिक्त झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला असलेलं मंत्रिपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता आहे. या पदासाठी राज्यसभेचे खासदार नारायण राणेंची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
भाजप नेतृत्त्वाकडून बोलावणं आल्यानं नारायण राणे सध्या दिल्लीत आहेत. आज सकाळीच त्यांनी दिल्ली गाठली. त्यांना पत्रकारांनी मंत्रिपदाबद्दल प्रश्न विचारले. त्यावर मी खासदार आहे. त्यामुळे मी दिल्लीत आल्याचं राणेंनी सांगितलं. 'संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं दिल्लीला आलो आहे. जर काही महत्त्वाचं घडलं तर आम्ही तुम्हाला सांगू. आम्ही तुमच्याकडून काही लपवू शकतो का?', असा सवाल राणेंनी विचारला.
तुम्हाला मंत्रिपद मिळणार का, तुम्हाला तसा फोन आला आहे का, असे प्रश्न पत्रकारांनी विचारले. त्यावर मंत्रिपदाचं आधी निश्चित होऊ दे. मला तरी अद्याप तसा कोणताही कॉल आलेला नाही, असं राणे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेला सातत्यानं अंगावर घेण्याचं काम राणेंनी केलं आहे. त्याच कामाची पावती म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.