मुंबई – ज्यानं आयुष्यात कुणाला थप्पड मारली नाही तो उघड उघड धमक्या देतोय, मी इथेच आहे, कोण कोणाला शिवथाळी देतोय बघू. राणे स्टाईलनं शिवसेनेला थाळी मिळेल. राणे मैदानात उतरतात तेव्हा पळणाऱ्यांना पळून जाण्याची संधी देत नाहीत. ज्यांनी महिलांवर हात उचलला त्यांची नावं आमच्याकडे आली आहेत. त्यांना पाहून घेऊ असा इशारा भाजपा खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला आहे.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. राणे म्हणाले की, आधी स्वत:ला सांभाळा, तुमच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे सांगता येणार नाही. ज्यांनी महिलांवर अत्याचार केले त्याला सोडणार नाही. प्रसादाची परतफेड कशी करायची हे आम्हाला ठाऊक आहे. शिवसेनेतच शिकलो आहे. तुम्ही दिलेली व्हेज थाळी होती आता नॉनव्हेज थाळी कशी द्यायची आम्हाला माहिती आहे. स्वत:ला सांभाळलं नाही तर तुमच्या वाटेलाही शिवथाळी येईल हे समजणार नाही असं राणेंनी संजय राऊतांना नाव न घेता टोला लगावला आहे.
आजची शिवसेना ही बाळासाहेबांची नाही तर उद्धव-आदित्यची आहे. हिंदुत्व गुंडाळून ठेवणाऱ्यांनी हिंदुत्वाची भाषा करू नये. शिवसेना भवनाचा इतिहास राऊतांना माहिती आहे का? तेव्हा शिवसेनेत तरी होता का? तुम्ही लोकप्रभात होता. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंवर टीका करत होता. कोणत्या भाषेत टीका केली ते प्रहारमध्ये छापू का? माझ्यासारख्या शिवसैनिकांनी स्वत: वर्गणी दिली. तेव्हा शिवसेना भवन उभं राहिलं. तुमचं योगदान तरी काय? असा सवाल नारायण राणेंनी संजय राऊतांना विचारला आहे.
सिंधुदुर्गात भाजपा-शिवसेनेत राडा
शिवसेना वर्धापनदिनी भाजपा कार्यकर्त्यांना १ लीटर पेट्रोल मोफत देण्याचे बॅनर्स शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी लावले होते. त्यानंतर पेट्रोल पंपावर भाजपा कार्यकर्ते आणि आमदार वैभव नाईक यांच्यात झटापट झाली. त्यानंतर वैभव नाईक यांनी तिथून काढता पाय घेतला. कायदा आणि सुव्यवस्थेची भाषा करणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलिसांना भर रस्त्यावर वर्दी पकडत धक्काबुक्की करण्याऱ्या आपल्या पक्षाच्या आमदारावर गुन्हे दाखल करायची हिंमत दाखवावी, असे आव्हान भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी दिले. शिवसेना आणि आमदार वैभव नाईक यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणाबाजीने वातावरण काही काळ तंग झाले होते.
वैभव नाईकांसमोर पेच...
वैभव नाईक यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचा कणकवली, वागदेमध्ये पेट्रोल पंप आहे. परंतु वैभव नाईक हे कुडाळ-मालवण मतदारसंघातून आमदार आहेत. जो नारायण राणेंचा मतदारसंघ आहे. तेथून पहिल्यावेळी ते नारायण राणेंना हरवून निवडून आले होते. नाईकांचा पेट्रोल पंप त्यांच्या मतदारसंघात नसल्याने राजकीय उद्देशासाठी त्याचा ते वापर करू शकत नाहीत. तो पेट्रोल पंप नारायण राणेंचे आमदार पूत्र नितेश राणेंच्या मतदारसंघात आहे. मालवण शहरात एकच पेट्रोल पंप आहे, तो देखील राणेंच्याच मालकीचा आहे. यामुळे आता वैभव नाईकांना त्यांचे डावपेच फोल जाऊ द्यायचे नसतील तर कुडाळ शहराबाहेरील पेट्रोल पंपांचा आधार घ्यावा लागणार आहे. परंतू हे पेट्रोल पंप लांब असल्याने त्यांचा प्रयत्न तेवढा यशस्वी ठरला नाही.