नवी दिल्ली - भाजपाच्या भोपाळमधील खासदार (BJP MP) प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांनी कोरोना लसीचा (Corona Vaccine) पहिला डोस घेतला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या एका टीमने त्यांच्या घरी जाऊन त्यांना लस दिली. प्रकृती बरी नसल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांनी लस घेतली नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता घरच्या घरी त्यांनी लस देण्यात आल्याने काँग्रेसने यावरून जोरदार निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकूर यांचा बास्केटबॉल खेळत असतानाचा आणि डान्स करत असतानाच्या व्हिडीओची आठवण करून देत काँग्रेसने काही सवाल विचारले आहेत.
आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय असलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर आता आपल्या लसीकरणावरून पुन्हा एकदा चर्चेत आल्या आल्या आहेत. विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मोदींसह भाजपाचे मोठे नेते हे रुग्णालयात जाऊन लसीकरण करत आहेत आणि अशा परिस्थितीत ठाकूर यांना घरबसल्या लस मिळते यावरून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काँग्रेसचे नेते नरेंद्र सलूजा यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. ठाकूर यांना कोणत्या आधारावर घरबसल्या कोरोना लस मिळाली याचं उत्तर द्या असं सलूजा यांनी म्हटलं आहे.
"काही दिवसांपूर्वी बास्केट बॉल खेळणाऱ्या, डान्स करणाऱ्या भोपळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना घरी टीम पाठवून कोरोनाची लस देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यासारखे अऩेक मोठे नेते स्वतः लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोना लस घेत असताना प्रज्ञा सिंह ठाकूर यांना कोणत्या आधारावर घरपोच लस देण्यात आली याच उत्तर मिळायलाच हवं" असं काँग्रेसने म्हटलं आहे. ठाकूर यांना कर्करोग असून त्यांना चालताही येत नसल्याचं सांगितलं जातं. मात्र आता त्यांची व्हिलचेअर कुठे गेली, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रज्ञा सिंह भोपाळमधील शक्ती नगर येथील बास्केटबॉल मैदानावर वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी मैदानावर मुलांना खेळताना पाहून त्या त्यांच्याजवळ गेल्या आणि स्वतः खेळायलाही लागल्या. त्यांचा बास्केटबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला होता. 'भोपाळच्या भाजपा खासदार ठाकूर यांना आतापर्यंत व्हिलचेअरवरच पाहिले होते. मात्र आज त्यांना भोपाळमध्ये स्टेडिअममध्ये बास्केटबॉल खेळताना पाहून मोठा आनंद झाला... आतापर्यंत एवढेच माहीत होते, की कोण्या दुखापतीमुळे त्यांना व्यवस्थित उभे राहता अथवा चालता, फिरता येत नाही…? ईश्वर त्यांना नेहमीच ठणठणीत ठेवो...' असं म्हटलं होतं.