माजी सैनिकावर हल्ला करणारा भाजपा खासदार तीन वर्षे मोकाट, कारवाई कधी होणार? काँग्रेसचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 04:20 PM2020-09-13T16:20:21+5:302020-09-13T16:30:30+5:30
भाजपाला सैनिकांबद्दल फार कळवळा, प्रेम, आदर आहे असे नाही. सैनिकांप्रती त्यांना खराच आदर असता तर जळगाव मधील माजी सैनिक सोनू महाजन यांना न्यायासाठी चार वर्षांपासून भटकावे लागले नसते.
मुंबई - मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरुन आकांडतांडव करणाऱ्या भाजपाला सैनिकांबद्दल फार कळवळा, प्रेम, आदर आहे असे नाही. सैनिकांप्रती त्यांना खराच आदर असता तर जळगाव मधील माजी सैनिक सोनू महाजन यांना न्यायासाठी चार वर्षांपासून भटकावे लागले नसते. त्यांच्यावर २०१६ साली हल्ला करण्यात आला त्याची दखलही फडणवीस सरकारने घेतली नाही, तीन वर्षे एफआयआरही दाखल केला नाही. मुंबईतील प्रकरणात निवृत्त अधिकाऱ्याच्या न्यायासाठी धडपडणारा भाजप सोनू महाजनांना न्याय कधी मिळवून देणार, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
सावंत म्हणाले की, जळगाव मधील माजी सैनिक सोनु महाजन यांच्यावर २०१६ साली भाजपाचे आमदार उन्मेष पाटील जे आता खासदार आहेत त्यांच्या आदेशावरून हल्ला करण्यात आला. राज्यात त्यावेळी फडणवीस यांचे सरकार होते, तेच गृहमंत्रीही होते तरीही एफआयआर सुद्धा दाखल करुन घेतला नाही. उच्च न्यायालयाने २०१९ मध्ये आदेश दिल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला परंतु आजपर्यंत उन्मेष पाटील यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. संरक्षणमंत्री राजनाथसिंह किंवा त्यांच्या आधीच्या संरक्षण मंत्र्यांनेही याची दखल घेतली नाही. राजनाथसिंह सोनु महाजन यांच्यावरील हल्ल्याची दखल घेऊन फोन करणार आहेत का ? सैनिका -सैनिकांमध्ये संरक्षणमंत्र्यांनी भेदभाव का करावा ? असे सावंत म्हणाले.
In 2019, under the Devendra Fadnavis govt, an attempt to murder Army veteran Sonu Mahajan was made on orders of Chalisgaon BJP MP Unmesh Patil
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 13, 2020
The family had to approach High Court to even get a case registered. Till date, no action has been taken by the BJP against its own MP. pic.twitter.com/wKBLMYk0xm
मुंबईत निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना झालेली मारहाण असो वा इतर कोणत्याही व्यक्तीला मारहाण करणे हे निंदनीयच आहे. मुंबईत झालेल्या या प्रकरणात तत्काळ एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जळगाव प्रकरणी तशी तत्परता का दाखवली गेली नाही याचे उत्तर भाजपाने द्यावे. पण भाजपाचे देशप्रेम, सैनिकांबद्दलचा आदर हे त्यांचेच आमदार प्रशांत परिचारक यांचे सैनिकांबद्दलचे वक्तव्य व जळगावचे महाजन मारहाण प्रकरण यावरून दिसून आले आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी सैनिक सोनू महाजन प्रकरणाचा पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु, असेही सावंत म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी