मुंबई - शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभीकरण) विधेयक, 2020 आणि शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) करार किंमत आश्वासन आणि कृषीसेवा विधेयक, 2020 ही दोन कृषी विधेयके राज्यसभेत गदारोळात मंजूर करण्यात आली. केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात विरोधकांसह शेतकरी संघटनांकडून आवाज उठवला जात आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या वतीने पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून 'शेती वाचवा' अभियान सुरू झाले आहे. या तीन दिवसीय अभियानाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते राहुल गांधी करत आहेत.
राहुल गांधी मोहिमेदरम्यान स्वत: ट्रॅक्टर चालवत खेड्यांमधील शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. या ट्रॅक्टर रॅलीत हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याचं म्हटलं होतं. काँग्रेसच्या या रॅलीत मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. मात्र शेतकऱ्यांच्या उपस्थितीबद्दल अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात आली. यावरूनच भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार" असं म्हणत निलेश यांनी निशाणा साधला आहे.
"राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार"
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं ट्विट केलं आहे. "राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार. कृषी बिलाची चर्चा सभागृहात होत असताना राहुल गांधी प्रदेशात होते, शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कळतं. राहुल गांधींच्या 'शेती वाचवा' आंदोलनात, सभांमधून शेतकरी मात्र गायब!" असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीदेखील या आंदोलनावरून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. “राहुल गांधी हे व्हीआयपी शेतकरी आहेत. ते ट्रॅक्टरवरही सोफा लावून बसतात,” असं इराणी यांनी म्हटलं आहे.
"राहुल गांधींच्या ट्रॅक्टर रॅलीला राज्यात प्रवेश करू देणार नाही"
कुरुक्षेत्रमध्ये ही रॅली थांबविण्यात येणार आहे. मात्र राहुल गांधींच्या ट्रॅक्टर रॅलीला राज्यात प्रवेश करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी घेतली आहे. रॅलीवरून हरयाणाचे माजी कृषिमंत्री आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष ओपी धनखड यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. जर राहुल गांधी यांना राज्यात ट्रॅक्टर रॅली घ्यायची असेल तर त्यांनी रॉबर्ट वड्रा यांनाही बरोबर आणावे, असे ओपी धनखड़ यांनी म्हटलं आहे.
शिरोमणी अकाली दलाने राहुल गांधींना विचारले प्रश्न
दुसरीकडे, शिरोमणी अकाली दलाने राहुल गांधी यांना दोन प्रश्न विचारले आहेत. एक म्हणजे, ज्यावेळी लोकसभेत कृषी संबंधित तीन बिले सादर केली जात होती, त्यावेळी तुम्ही गैरहजर का होता? आणि दुसरा काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पारंपारिक कृषी उत्पन्न पणन समिती (एपीएमसी) हटविण्याविषयी चर्चा का केली होती? असे सवाल शिरोमणी अकाली दलाने केले आहेत.