मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) जबरदस्त तडाखा सोमवारी कोकणासह मुंबई, ठाणे आणि पालघरला बसला. ताशी ८० ते १२० किमी वेगाने वाहणारा धडकी भरवणारा सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे हजारांवर झाडे भुईसपाट झाली, तर चार हजारांवर घरांचे नुकसान झाले. सोमवारी जोरदार कोसळणाऱ्या पावसाने मुंबईकरांना अक्षरश: धडकी भरली. सखल भागात पाणी साचल्याने आणि मोठ्या संख्येने झाडे उन्मळून पडल्याने रस्ते वाहतूक मंदावली. रेल्वे ट्रॅकवरदेखील झाडे पडल्याच्या घटना घडल्याने लोकल वाहतुकही काही काळ खंडित झाली. यानंतर आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
भाजपा नेते निलेश राणे (BJP Nilesh Rane) यांनी मुंबईतील पावसाचा एक व्हिडीओ शेअर करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Shivsena Aditya Thackrey) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. वरळी (Worli) हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ. तौत्के चक्रीवादळानंतरचा वरळीमध्ये रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा एक व्हिडीओ निलेश राणेंनी ट्वीट केला असून आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. "तो केम छो वरळी विचारणारा आमदार कुठे आहे???" असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. तसेच सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही असं देखील म्हटलं आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हिडीओ ट्विट करून आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
"हे चित्र वरळी मतदार संघाचं आहे... वरळीकर विचारतायत तो 'केम छो वरळी' विचारणारा आमदार कुठे आहे??? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली??? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही" असं म्हणत निलेश राणे यांनी पावसामुळे वरळीमध्ये झालेल्या परिस्थितीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नागरिक गुडघाभर पाण्यामधून जात असलेले पाहायला मिळत आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं देखील दिसत आहे. यामुळेच निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
तौत्के चक्रीवादळाचा मुंबई तसेच सागरीकिनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील प्रभाव ओसरला असला तरी मदतकार्य वेगाने सुरू ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी प्रशासनाला दिले. कोविड रुग्णालयांना वीजपुरवठा खंडित होऊ दिला नाही. पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात चार, रत्नागिरी, ठाणे प्रत्येकी दोन, सिंधुदुर्ग आणि धुळे जिल्ह्यात प्रत्येकी एक मीरा रोड येथे १ अशा एकूण ११ जणांचा बळी गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन त्यांनी दिले.
तौत्केचा तडाखा! मुंबई, कोकणात मोठे नुकसान
कोकणात रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला. त्याखालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे. वादळाच्या प्रभावामुळे पश्चिम महाराष्ट्रासह नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. ठाणे जिल्ह्यात २४, पालघर ४, रायगड १७८४, रत्नागिरी ६१, पुणे १०१, कोल्हापूर २७, सातारा येथे सहा घरांची पडझड झाली. वादळाबाबत माहिती घेण्यासाठी केंद्रीय पथक लवकरच राज्यात येण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती आधीच अडचणीची आहे. कोकणातील वादळग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची भूमिका राज्य शासनाला घ्यावी लागणार आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारने राज्याला मदतीचे पॅकेज द्यावे, अशी मागणी राज्य शासनाकडून केंद्राकडे केली जाण्याची शक्यता आहे.