मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने सत्ताधारी एनडीएविरोधात आक्रमक पवित्रा घेत उमेदवार उभे केले होते. पहिल्यांदा बिहारमध्ये शिवसेना 50 जागांवर लढणार असल्याचं जाहीर केले. परंतु शिवसेनेने 22 जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र यातील सर्व 22 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झालं आहे. भाजपाने नेते निलेश राणे यांनी यावरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच संजय राऊतांवरही टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
निलेश राणे यांनी सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होणाऱ्या शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या यादीचा मजकूर पोस्ट केला आहे. यासोबतच "वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन" असं म्हटलं आहे. तसेच बिहारमध्ये शिवसेनेची परिस्थिती जशी झाली आहे तशीच परिस्थिती महाराष्ट्रातसंजय राऊत यांच्यामुळे होईल असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे. "संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत विरोधकांना भीती नाही कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात राऊत करतील ही आम्हाला खात्री आहे" असं ट्विट केलं आहे.
"राहुल गांधींना राजकारणात बरच शिकावं लागेल. भाजपासमोर राजकरण करताना राजकारणाची उंची किती व कशी असली पाहिजे हे बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक निवडणुकीने दाखवून दिले. राहुल गांधींच्या नेहमीच्या 15 मिनिटांच्या भाषणामध्ये 12 मिनिटं फक्त मोदींची बदनामी ही कोणाला पचत नाही आणि पटतही नाही" असं देखील निलेश राणे यांनी म्हटलं आहे. निलेश राणे यांनी याआधीही अनेकदा शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
‘जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज’ भ्रष्ट काँग्रेसशी युती करून बसलेत, भाजपाचा शिवसेनेवर निशाणा
बिहारच्या निकालात तेजस्वी यादव यांचं कौतुक करणाऱ्या शिवसेनेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी चांगलाच चिमटा काढला आहे. शेलारांनी ट्विट करून म्हटलंय की, भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत सलगी केलेलेल्या "जगंलराज का युवराज" ला बिहारच्या जनतेने नाकरले आता महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत "जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज" युती करुन बसलेत. समजनेवाले को इशारा काफी है अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.