मुंबई - वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांच्या कुटुंबानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना जमीन विकल्याची कागदपत्रं दाखवून व्यवहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांना नाईक कुटुंबानं प्रत्युत्तर दिलं आहे. आपण काही तरी मोठी गोष्ट जनतेसमोर आणत असल्याचा किरीट सोमय्यांचा आविर्भाव आहे. मात्र त्या जमीन व्यवहारात लपवण्यासारखं काहीच नाही. आम्ही कोणाला जमीन विकू शकत नाही का? आम्ही कोणाला जमीन विकावी, हा आमचा प्रश्न आहे, असं अक्षता आणि आज्ञा नाईक म्हणाल्या.
भाजपा नेते निलेश राणे यांनी यावरून आता पुन्हा एकदा ठाकरे आणि नाईक कुटुंबीयांवर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. "आरोप झालेत ठाकरे कुटुंबावर, उत्तर देतायत नाईक कुटुंब; मोठा झोलझाल, फारच जवळचे संबंध दिसतायत" असं निलेश यांनी म्हटलं आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "नाईक कुटुंबाला इतकी मिरची लागली की आरोप झालेत ठाकरे कुटुंबावर आणि उत्तर देतायत नाईक कुटुंब. मोठा झोलझाल दिसतोय. फारच जवळचे संबंध दिसतायत" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
'आम्ही जमीन विकली. यामध्ये गैर काय? किरीट सोमय्या ७/१२ दाखवत आहेत. ७/१२ म्हणजे काही गोपनीय कागदपत्र नाही. तो सहज महाभूमीवर उपलब्ध होतो. त्यांना आणखी काही कागदपत्रं हवं असल्यास मी त्यांना सहकार्य करेन,' असं आज्ञा नाईक यांनी म्हटलं. सोमय्या उगाच राजकारण करत आहेत. ते राजकारण करण्यासाठी काहीही करू शकतात, अशा शब्दांत अक्षता नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं.
'अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींविरोधात कारवाई झाल्यावर सोमय्यांना जाग आली. आम्ही २०१८ मध्ये अन्वय नाईक यांच्या प्रेताला अग्नी दिला. तेव्हा सोमय्या कुठे होते? त्यावेळी ते झोपले होते का?,' असे सवाल नाईक यांनी उपस्थित केले. माझ्या घरातील दोन माणसं गेली आहेत. सोमय्यांना जराही माणुसकी नाहीए का? गोस्वामी अडचणीत आल्यावरच त्यांना जाग आली का? ते एका गुन्हेगाराला पाठिशी का घालताहेत?,' असे प्रश्न त्यांनी विचारले. किरीट यांची बोबडी वळलेलीच आहे. पण त्यांचा आवाज बंद व्हायला वेळ लागणार नाही, अशा शब्दांत अक्षता नाईक यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांच्यात अनेक जमीन व्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ठाकरे कुटुंबाची जमिनीत इतकी गुंतवणूक का आणि कशासाठी? त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का? मुख्यमंत्री याची माहिती राज्यातल्या जनतेला देणार का?, अशी प्रश्नांची सरबत्ती सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केली.
नाईक-ठाकरे-वायकर कुटुंबाचे नेमके संबंध काय? वायकर आणि ठाकरे कुटुंबं कशाला एकत्र आली? जमीन खरेदी व्यवहारात अनेकदा ब्लॅक-व्हाईट असतं. लोकांना तसं वाटतं. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला जमीन खरेदी व्यवहाराची माहिती द्यावी, असं आवाहन सोमय्या यांनी केलं. उद्धव ठाकरेंचा जमीन खरेदीचा व्यवसाय आहे का? तसं असेल तर त्यांनी जनतेला सांगावं, असंही सोमय्या पुढे म्हणाले.