मुंबई – शेतकरी आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत विरोधकांना लक्ष्य केले. कृषी सुधारणावर बोलणारे सत्तेत असताना या कायद्याच्या बाजूने बोलत होते, आता राजकारणासाठी विरोध करत आहेत. देशात आंदोलन करत आहेत, देशात आंदोलनजीवी नावाची जमात निर्माण झाली आहे, त्यांना आंदोलन केल्याशिवाय जमत नाहीत असा टोला लगावला होता.
पंतप्रधानांच्या या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता, मात्र त्याचसोबत आता सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडीओच्या माध्यमातून नेटीझन्स पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाची खिल्ली उडवत आहेत. काँग्रेसची सत्ता असतानाचा हा व्हिडीओ आहे, ज्यावेळी पंतप्रधानपदावर डॉ. मनमोहन सिंग होते.(Nitin Gadkari old video viral in Social Media over PM Narendra Modi Statement of Andolanjivi)
नितीन गडकरी व्हिडीओत म्हणतात की, पंतप्रधान जे बोलत आहेत ते लोकशाहीच्या विरोधात आहे, या देशात भ्रष्ट नेत्यांविरोधात, सरकारविरोधात आंदोलन करणं घटनेनं दिलेला अधिकार आहे, येथील जनतेचा अधिकार आहे, हा अधिकार काँग्रेस पक्ष किंवा पंतप्रधानांनी दिला नाही, तर संविधानाने दिला आहे. मुलभूत अधिकार, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, शांततेत लोकांनी आंदोलन करू नये हे पंतप्रधान कोणत्या आधारे बोलू शकतात. पंतप्रधानांचे म्हणणं कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे का? संविधानाच्या चौकटीत पंतप्रधान हे बोलू शकतात का? याचं पंतप्रधानांनी आत्मचिंतन करणं गरजेचे आहे असं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही नरेंद्र मोदी यांच्या विधानाची खिल्ली उडवत ट्विट केले आहे. या व्हिडीओत भाजपा नेत्यांनी केलेलं आंदोलन, त्याचसोबत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या यांच्या विधानाचा आधार घेत व्हिडीओ पोस्ट केला आहे.
काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल मांडण्यात आलेल्या आभार प्रदर्शनाच्या ठरावावरील चर्चेत विरोधकांनी अनेक मुद्दे राज्यसभेत उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की, आंदोलन केल्याशिवाय जगू न शकणारी ‘आंदोलनजीवी’ ही नवी जमात सध्या देशात पैदा झाली आहे. या आंदोलनकारी प्रवृत्तींपासून देशाने सावध राहायला हवे असं त्यांनी विधान केले होते.
गर्व से कहो हम आंदोलनजीवी है
शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत मोदींच्या आंदोलनजीवी टीकेला प्रत्युतर दिलं होतं, विशेष म्हणजे गर्व से कहो हम हिंदू है... या घोषवाक्याचं रुपांतरच त्यांनी आंदोलनजीवी या शब्दाशी जोडून केलंय, गर्व से कहो हम आंदोलनजीवी है... जय जवान- जय किसान असं म्हणत त्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या भेटीचा फोटो जोडला होता.