मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यांत अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला होता. मात्र, काही वेळातच त्यांनी त्यावरून यु टर्न घेतला. यावरून भाजपने नाना पटोले यांच्यावर खोचक टीका केली असून, नाना पटोले यांची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे, अशी झाल्याचे म्हटले आहे. (bjp pravin darekar criticised nana patole over phone tapping case)
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात फोन टॅपिंग प्रकरणी तीव्र आक्षेप घेत खळबळ उडवून दिली होती. त्या मुद्द्यावरून राजकारण सुरू असतानाच राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपल्या हालचालींवर पाळत ठेवत आहेत, असे मोठे आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही नाना पटोले यांना टोला लगावला. यानंतर आता भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाना पटोलेंना टोला लगावला आहे.
“जनगणनेत ८ कोटी चुका नाहीत, फडणवीस दिशाभूल करतायत”; चव्हाणांनी केली पोलखोल
कदाचित त्यांच्या भावना खऱ्या असतील
कदाचित नाना पटोले यांच्या भावना खऱ्या असतील. ते येतात जोरात, पण त्यांनी एकदाच नाही, तर अनेक वेळा तलवार म्यान केली आहे. अजित पवारांची नाराजी आणि मुख्यमंत्र्यांनी दट्ट्या दिला असेल, असा दावा करत नाना पटोले यांची अवस्था रोज मरे, त्याला कोण रडे अशी झाली आहे, असा टोला दरेकरांनी लगावला.
ते महाराष्ट्राच्या जनतेला काय विश्वास देणार
सरकार टिकणे ही सगळ्यांची गरज असल्यामुळेच नाना पटोले यांनी आपली तलवार म्यान केली असेल. भावना तर त्यांनी प्रकट केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय चालले आहे, हे जनतेसमोर आले आहे. त्यामुळे जे एकमेकांवर विश्वास ठेऊ शकत नाहीत, ते महाराष्ट्राच्या जनतेला काय विश्वास देणार, असे चित्र राज्यात उभे राहाताना दिसत आहे, असे दरेकर यांनी म्हटले आहे.
झोटिंग समिती फास होता, एकनाथ खडसेंना केवळ त्रास होता; नाना पटोलेंची फडणवीसांवर टीका
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये एकमत आहे. माझे वाक्य तोडून मोडून दाखवले. मी काही चुकीचे बोललो नाही. पक्षप्रमुख म्हणून बोलणे हे काम आहे. कार्यकर्त्याचे गाऱ्हाणे ऐकणे माझे काम आहे, असे सांगत पण मला विरोध का होतो, हे माहिती नाही. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्व सुरळीत सुरु आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.