मुंबई: मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून गेल्या काही दिवसांपासून भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिले नाही, तर राजकीय संन्यास घेईन, असे मोठे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावरून आता राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे भविष्य उज्ज्वल असून, त्यांना संन्यास घेऊ देणार नाही, असे म्हटले आहे. यावर, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची करावी, असा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे. (bjp pravin darekar replied sanjay raut and says worry about shiv sena instead of devendra fadnavis)
“देवेंद्र फडणवीसांचे भविष्य उज्ज्वल, संन्यास घेण्याची भाषा शोभत नाही”: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस लढवय्ये नेते आहेत. त्यांना संन्यास घेऊ देणार नाही. त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. अशी भाषा त्यांना शोभत नाही. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. देवेंद्र फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांने फकीर होण्याची भाषा करणे योग्य नाही. संन्यास वगैरे घेण्याची भाषा करू नका, त्यासाठी मी त्यांना स्वत: भेटून सांगेन, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर, आता भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
“वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं”
संजय राऊत यांनी शिवसेनेची चिंता करावी!
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी. अलीकडच्या काळात संजय राऊत शिवसेनेची चिंता करण्यापेक्षा राष्ट्रवादीची चिंता जास्त करताना दिसत आहेत. यामुळे शिवसेनेत नाराजी आणि अस्वस्थता आहे. शिवसेनेची चिंता केली, तर शिवसैनिक त्यांना धन्यवाद देतील, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीसांची घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे तुम्ही फार गांभीर्याने घेतले आहे. ते म्हणाले होते की, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू. मात्र, तसे झाले नाही. सत्तेसाठी काहीही बोलायचे, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. सामान्यांना फसवणे आणि सत्ता मिळवणे हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात. स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र, त्यानंतर काय झाले आपण सर्वांनी पाहिले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.