मुंबई - राज्यातील सरकार बरखास्त करण्याची वारंवार मागणी करुन फडणवीस विरोधी पक्षाचं हसं करत आहेत अशी जोरदार टीका शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केली आहे. परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली. परमबीर सिंह यांच्या पत्रात संशय घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. इतर कोणी पत्र लिहून दिले आणि परमबीर सिंग यांनी त्यावर फक्त सही केली का, अशी शंका संजय राऊत यांनी बोलून दाखवली आहे. संजय राऊत आज दिल्लीतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यानंतर आता भाजपाने संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
BJP Pravin Darekar And Shivsena Sanjay Raut Over Anil Deshmukh
अनिल देशमुखांवरून भाजपाने राऊतांना टोला लगावला आहे. "संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखे वक्तव्य करत आहेत" असं म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे. भाजपा नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखे वक्तव्य करत आहेत. शिवसेना नेत्यांची पाठराखण करायला विसरलेले राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसची पाठराखण अत्यंत इमानाने करताना दिसताहेत" असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
"संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी केलेलं कृत्य अयोग्यच आहे. मात्र, शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या. बंजारा समाज शिवसेनेच्या पाठीशी उभा केला. या नेत्याची पाठराखण संजय राऊत यांनी केली नाही. राठोड यांच्या चौकशीसाठी राजीनाम्याची गरज नाही असं राऊत कधी बोलले नाहीत. आपल्याच नेत्याला विसरलेले राऊत आता अनिल देशमुख यांची पाठराख इमानेइतबारे करत आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत म्हणून अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी राजीनाम्याची आवश्यकता नाही असा निर्वाळा देताना संजय राऊत या ठिकाणी दिसून येत आहेत" अस दरेकर यांनी म्हटलं आहे.
ठाकरे सरकारचा बेधुंद कारभार, सर्व स्तरावर अराजकता; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी प्रवीण दरेकरांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भेटल्यानंतर प्रवीण दरेकर पत्रकारांशी बोलत होते. राज्यपालांनी अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊन, राष्ट्रपतींपर्यंत त्याचा रिपोर्ट पोहोचवावा. केवळ भाजपाचीच मागणी आहे म्हणून नाही. तर, राज्यात सर्वस्तरावर अराजकता पसरलेली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक सरकारं झाली, पण इतका बेधुंद कारभार आणि अशाप्रकारची चर्चा व गोष्टी या अगोदर कधीच झाल्या नाहीत, अशी टीका दरेकर यांनी यावेळी केली.