मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद असल्याचं समोर आलं आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर अलीकडेच नाना पटोलेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर पाळत ठेवत असल्याचं गंभीर आरोप केला होता. यानंतर आता भाजपाचे नेते प्रविण दरेकर (BJP Pravin Darekar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. "बळ-बळ करणाऱ्यांना जनता पळ काढायला लावेल" असं म्हणत प्रविण दरेकर यांनी सणसणीत टोला लगावला आहे.
प्रविण दरेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "सत्तेच्या खुर्चीभोवती पिंगा घालणारे महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्ष स्वबळाची भाषा करतायत,परंतु जनता त्यांना 'पळ' काढायला लावल्याशिवाय शांत बसणार नाही!" असं दरेकर यांनी म्हटलं आहे. तसेच "यांना पक्षाच्या स्वबळाचं पडलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारची ताकद राहिलेली नाही. त्याच्या हातात बळ राहिलेलं नाही. आज कामगार देशोधडीला लागले आहेत. त्यांच्या हातात कोणतंही बळ राहिलेलं नाही आणि अशा वेळी यांना स्वबळाचं त्य़ाठिकाणी पडलेलं आहे. पण जर अशाप्रकारे सत्तेभोवती पिंगा घालत बसले तर याठिकाणी बळ-बळ करताना ही जनता त्यांना पळ काढायला लावल्याशिवाय राहणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे" असं दरेकर यांनी म्हटलं आहे.
आपल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करत नाना पटोले (Nana Patole) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष असलेल्या नानांच्या या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. दरम्यान, या विधानावरून महाविकास आघाडीमध्ये वाद वाढू लागल्यानंतर नाना पटोले यांनी सारवासारव सुरू केली आहे. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. काल्पनिक कहाण्या रचून राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पाडण्याचा डाव विरोधकांनी आखला आहे. मात्र आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगत नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
पाळत ठेवल्याच्या सनसनाटी आरोपांनंतर नाना पटोलेंची पलटी, भाजपाला टोला लगावत म्हणाले...
आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा आरोप केल्यानंतर निर्माण झालेल्या वादाबाबत स्पष्टीकरण देताना नाना पटोले म्हणाले की, सध्या आमच्याविरोधात काल्पनिक कहाण्या रचण्याचे काम सुरू आहे. मी पुण्यात असताना काही कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. तेव्हा मी म्हणालो होतो की, राज्यात काँग्रेसला मिळत असलेल्या प्रतिसादामध्ये वाढ झाली आहे. आमचे दौरे सुरू आहेत. त्याचा अहवाल रोज मुख्यमंत्र्यांकडे जातो. तसेच राज्य सरकारसोबतच असा अहवाल केंद्र सरकारकडेही जात असतो. प्रत्येत घडामोडीची माहिती राज्य आणि केंद्र सरकारला मिळत असते. प्रत्येक जिल्ह्याची, विभागाची माहिती सरकारला मिळत असते. तशीच माझी आणि पक्षाच्या इतर नेत्यांची माहितीही दिली जात असते, ही प्रक्रिया मी कार्यकर्त्यांना समजावून सांगत होतो. मात्र माझ्या वक्तव्याचा चुकीचा उल्लेख काढला गेला. दरम्यान, राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेशी आमचे वैर नाही. हे सरकार पाच वर्षे टिकेल. मात्र भाजपाकडून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्यासाठी काल्पनिक कहाण्या पेरल्या जात आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला.