मुंबई – महाराष्ट्रात काय चाललंय, काहीच कळत नाही, कोरोना काळात काम करण्यास ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे, राज्यात देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं, पण राजकारणात धोका होत असतो अशा शब्दात भाजपा अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. भाजपाच्या राज्य कार्यकारणी बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जे.पी नड्डा म्हणाले की, राज्यातील जनतेने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच निवडून दिलं होतं, पण शिवसेनेनं धोका केला, हा धोका भाजपाशी नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेशी झाला आहे. येणाऱ्या काळात हे तिन्ही पक्ष विरोधात बसलेले दिसतील, सध्या आपण विरोधकांचे काम करू, येणाऱ्या काळात सत्ता आपलीच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच राज्यात भाजपाची सदस्य संख्या १ कोटींहून अधिक आहे, त्याबद्दल मी कार्यकारणीचे अभिनंदन करतो, आपण जगातील सर्वात मोठा पक्ष झालो आहोत, आता आपल्याला अजेंडा सेट करावा लागणार आहे. शिक्षणाच्या धोरणावर अनेकदा चर्चा झाली, परंतु केंद्राने आणलेले शिक्षण धोरण एकमताने मंजूर झालं, कृषी विधेयकाबाबत शरद पवारांनी कंत्राटीच्या बाजूने बोलले तर ते चांगले आणि मोदी बोलले तर ते शेतकरीविरोधी कसं? असा सवास जे.पी नड्डा यांनी काँग्रेस आणि शिवसेनेला विचारला आहे.
दरम्यान, स्वामिनाथन रिपोर्टला मोदी सरकारनं २०१४ पासून लागू करायला सुरुवात केली, कृषी विधेयकाचा फायदा हा शेतकऱ्यांनाच होणार आहे तर नुकसान व्यापाऱ्यांचे आहे. काँग्रेसनं जाहिरनाम्यात शेतकऱ्यांना एपीएमसीतून मुक्त करू सांगितलं पण आम्ही ते करून दाखवलं, तर काँग्रेस नेते आता ट्रॅक्टरवर गादी लावून फिरतायेत, भाजपा ट्रॅक्टर, नांगर आणि शेतकरी सन्मान करतं असंही जे.पी नड्डा यांनी सांगितले.
दादरच्या वसंत स्मृतीमध्ये भाजपाच्या नव्या प्रदेश कार्यकारणीची बैठक पार पडली, या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, खासदार प्रितम मुंडे, रक्षा खडसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी राष्ट्रीय कार्यकारणीत समावेश झालेल्या नेत्यांचा महाराष्ट्र भाजपाकडून सत्कार करण्यात आला.