ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून भाजपाची राज्य सरकार विरोधात तर काँग्रेसची केंद्र सरकार विरोधात निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 05:29 PM2021-06-26T17:29:26+5:302021-06-26T17:44:41+5:30
BJP And Congress : प्रदेश भाजपाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्या आंदोलन करण्यावरून सुद्धा शहर भाजपात दुफळी दिसून आली.
मीरा रोड - सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द ठरवल्यानंतर शनिवारी भाजपच्या दोन गटांनी वेगवेगळे आंदोलन महाविकास आघाडी सरकार विरोधात केले. आंदोलनावरून सुद्धा मीरा-भाईंदर भाजपात दोन गट पडल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. तर काँग्रेसच्या वतीने ओबीसी आरक्षण रद्द होण्यामागे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप करत आंदोलन केले गेले.
मीरा भाईंदर भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी रवी व्यास यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर भाजपाचे स्थानिक नेते माजी आमदार नरेंद्र मेहतासह त्यांच्या गटाने पाटील यांच्या नियुक्ती विरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर भाजपातील दुफळी स्पष्ट झाली आहे. प्रदेश भाजपाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्या आंदोलन करण्यावरून सुद्धा शहर भाजपात दुफळी दिसून आली.
नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष व्यास यांच्या नेतृत्वाखाली मॅक्सस मॉल समोरील नाक्यावर रास्तारोको करण्यात आला. यावेळी भाजपाचे अनेक ज्येष्ठ नगरसेवक ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. तर मेहता गटाच्या वतीने महापौर ज्योत्स्ना हसनाळे व उपाध्यक्ष अनिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली दहीसर चेकनाका जवळ रास्ता रोको आंदोलन केले गेले. भाजपाने ओबीसी आरक्षण रद्द होण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार असून सर्वोच्च न्यायालयात प्रभावी बाजू न मांडल्याने ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचे आरोप त्यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
दरम्यान भाईंदर पूर्वेला नवघर नाका येथे काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले. ओबीसी आरक्षण रद्द होण्यास केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप केला. यावेळी काँग्रेसचे आंदोलकांनी मोदी, फडणवीस व भाजपचा निषेध करत भाजपाने ओबीसी राजकीय आरक्षणासाठी आंदोलन करणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असाच प्रकार असल्याची टीका काँग्रेसने केली.