मुंबई : मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजप नेत्यांनी मंगळवारी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराबाहेर आंदोलन केले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गणपतीची आरती करत मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी दरेकर यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
मदिरालय खुले करणाऱ्या राज्य सरकारने आता मंदिराची दारे खुली करावीत या मागणीसाठी भाजपने आज सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन पुकारले होते. ‘मंदिरे बंद, उघडले बार, उद्धवा बेधुंद तुझे सरकार’ अशा घोषणांसह विविध ठिकाणी भजन, घंटानाद आणि उपोषण करण्यात आले. मंदिर उघडण्याबाबत अजूनही सरकारने निर्णय घेतलेला नाही. यासाठी सरकारला आम्ही अनेक पत्रे दिली. अनेक वेळा अर्ज केले, परंतु दुर्दैवाने हे ठाकरे सैरभैर सरकार आहे. लोकांचा आक्रोश, लोकांच्या भावना या सरकारला समजत नाहीत आणि त्यामुळे आज उद्धवा दार उघड... अशी सरकारला हाक देत आहोत. जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोचण्यासाठी घंटानाद आंदोलन करत आहोत, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली.कुठे गेले तुमचे हिंदुत्व, कुठे गेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे वैचारिक संस्कार. उद्धव ठाकरे यांचे बदलते स्वरूप या ठिकाणी दिसत आहे. घरातून कारभार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राज्यातील कोरोना प्रादुर्भावाबाबत कसलीही माहिती नाही. टीव्हीवरील माहितीनुसार ते आपल्या भूमिका मांडतात. रेस्टॉरंट आणि वाईन शॉप उघडायला प्राधान्य देणार, घरपोच दारू पोहोचवणार, त्यांना एसओपी करून देणार. पण, काळजी घेऊन मंदिर उघडायला पाहिजेत यावर सरकार कोणताही निर्णय घेत नाही हे दुर्दैवी आहे असेही दरेकर म्हणाले.