नाशिक : माजी आमदार आणि भाजपाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते व सुनील बागुल हे दोघे आज शिवबंधन बांधणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची या दोघांनी काल रात्री उशिरा भेट घेतल्याचे वृत्त आहे. आज सकाळी अकरा वाजता खासदार राऊत यांची पत्रकार परिषद आहे. यावेळी दोघे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दोघे शिवबंधन बांधणार आहेत. काल त्यांच्या भेटीच्या वेळी माजी महापौर विनायक पांडे देखील उपस्थितीत होते.
वसंत गीते आणि सुनील बागुल हे दोघेही मूळ शिवसैनिक आहेत. वसंत गीते हे नाशिक मध्ये शिवसेनेचे पाहिले महापौर होते. मनसे स्थापन झाल्यानंतर वसंत गीते यांनी राज ठाकरे यांना साथ दिली. नंतर ते मनसेचे आमदार देखील झाले. भाजपाची सत्ता आल्यानंतर ते या पक्षात दाखल झाले होते. नाशिक महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपाने त्यांचे पुत्र प्रथमेश गीते यांना उपमहापौर पद दिले होते.
सुनील बागुल हे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख होते. त्यांनी आधी राष्ट्रवादी आणि नंतर भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या आई भिकुबाई बागुल या भाजपाच्या विद्यमान उपमहापौर आहेत.