“काँग्रेसनं ठणकावलं म्हणून शिवसेना सत्तेसाठी लाचारी पत्करत गपगुमान बसणार?”; भाजपाचा सवाल

By प्रविण मरगळे | Published: January 7, 2021 10:49 AM2021-01-07T10:49:51+5:302021-01-07T10:55:19+5:30

Shiv Sena, BJP News: भाजपाने औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यात यावं यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. तर मनसेनेही याबाबत महाराष्ट्र सरकारला २६ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे.

BJP question to Shiv sena over Congress oppose rename of Aurangabad to Sambhajinagar | “काँग्रेसनं ठणकावलं म्हणून शिवसेना सत्तेसाठी लाचारी पत्करत गपगुमान बसणार?”; भाजपाचा सवाल

“काँग्रेसनं ठणकावलं म्हणून शिवसेना सत्तेसाठी लाचारी पत्करत गपगुमान बसणार?”; भाजपाचा सवाल

googlenewsNext
ठळक मुद्देविकासाच्या मुद्द्यांवर शिवसेनेला सांगण्यासारख काहीच नाही म्हणून भावनिक मुद्दे.आता नामांतराचा प्रस्ताव थेट कॅबिनेटमध्ये आणून उत्तर देणार?बाळासाहेब थोरातांच्या विधानावरून भाजपाचा शिवसेनेला टोला

मुंबई – औरंगाबाद नामांतरणावरून एकीकडे विरोधी भाजपा सत्ताधारी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनेही या प्रकरणावरून आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर CMO ट्विटर हँडलवरून संभाजीनगर(औरंगाबाद) असा उल्लेख असणारं ट्विट करण्यात आलं, त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे असं ठणकावून शिवसेनेला सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगाबादच्या नामांतरणावरून रान पेटलं आहे. भाजपाने औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यात यावं यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. तर मनसेनेही याबाबत महाराष्ट्र सरकारला २६ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. यातच मुख्यमंत्रिपदावर खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान असल्याने नामांतरणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे.

राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचा औरंगाबादच्या नामांतरणाला विरोध आहे. तर शिवसेना संभाजीनगर नामकरण करण्यासाठी तयार आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारची स्थापना करताना किमान समान कार्यक्रम आखण्यात आला. यानुसार महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याला विरोध केला आहे.

यावरून भाजपाने शिवसेनेला पुन्हा टोला लगावला आहे. काँग्रेसने ‘ठणकाऊन’ सांगितल्यावर आता शिवसेना काय म्हणणार? विकासाच्या मुद्द्यांवर शिवसेनेला सांगण्यासारख काहीच नाही म्हणून भावनिक मुद्दे. आता नामांतराचा प्रस्ताव थेट कॅबिनेटमध्ये आणून उत्तर देणार? का ठणकावलं की सत्तेसाठी लाचारी पत्करत गपगुमान बसणार? असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सत्ताधारी शिवसेनेला विचारला आहे.

काय आहे प्रकरण?

औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालय येथे नव्याने १६५ खाटा आणि ३६० पदांच्या निर्मितीस बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली, काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या खात्याच्या या निर्णयात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतरणाला स्पष्ट विरोध असल्याचे आधीच जाहीर आहे. मात्र असं असतानाही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असं केल्याने महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ३ ट्विट करत कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.   

Web Title: BJP question to Shiv sena over Congress oppose rename of Aurangabad to Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.