नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. मात्र आता भाजपाने राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. "पार्ट-टाईम राजकीय नेते म्हणून अपयशी झाल्यानंतर आता राहुल गांधींनी फुल टाइम लॉबिंग सुरू केली आहे का?" असं म्हणत राहुल यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तसेच राहुल गांधी अद्याप कोरोनावरील लस का घेतली नाही? राहुल गांधींना लस घ्यायची नाही का?" असा सवाल देखील विचारला आहे.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. "पार्ट-टाईम राजकीय नेते म्हणून अपयशी झाल्यानंतर आता राहुल गांधी यांनी फुल टाइम लॉबिंग सुरू केली आहे का? आधी त्यांनी राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेला खीळ बसवण्यासाठी इतर विमान कंपन्यांसाठी लॉबिंग केले. आता विदेशी औषध कंपन्यांच्या लसींसाठी लॉबिंग करत आहेत" असा आरोप रविशंकर यांनी केला आहे. तसेच त्यांनी कोरोना लसीकरणावरून देखईल सणसणीत टोला लगावला आहे.
"काँग्रेसशासित राज्यांमध्ये कोरोनावरील लसीचा तुटवडा नाही तर योग्य आरोग्य सेवा देण्याचा तुटवडा आहे. त्यांनी आपल्या राज्यांना पत्र लिहिलं पाहिजे. वसुली मोहीम थांबवा आणि लसींचे लाखो डोस दडवून ठेवण्यापेक्षा नागरिकांना देण्यासाठी लक्ष केंद्रीत करा असं राहुल गांधींनी सांगितलं पाहिजे. भारतात लसींचा तुटवडा नाही. पण राहुल यांना मात्र आपल्यावरील दुर्लक्षाचा सामना करावा लागतो. राहुल गांधी अद्याप कोरोनावरील लस का घेतली नाही? राहुल गांधींना लस घ्यायची नाहीए का? की त्यांनी आधीच लस घेतली आहे? जसे ते विदेशात गुपचुप दौरे करून येतात आणि उघड करत नाहीत, तसंच लसीबाबत आहे का?" असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.
"केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अॅलर्जी" आहे असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची भयंकर अशी दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतत आहेत. सर्वसामान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील अत्यंत आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अॅलर्जी आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.