नवी दिल्ली - काल शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. दरम्यान, शिवसेना भवनासमोर झालेल्या वादानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर करत भाजपाला इशारा दिली होता. दरम्यान, आता भाजपानेही बाळासाहेबांचाच एक व्हिडीओ शेअर करून शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. (BJP MLA Atul Bhatkalkar shared Balasaheb Thackeray' Video & Criticize Shiv sena )
भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. भाजयुमोच्या फटकार मोर्चानंतर काही जणांनी शिवसेनाप्रमुखांचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यांच्यासाठी सोनिया मातोश्रींचा आणि त्यांच्यासमोर वाकणाऱ्यांचा विशेष उल्लेख असलेला हा खास व्हिडीओ, असा खोचक टोला लगावत अतुल भातखळकर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, राम मंदिर न्यासाच्या अयोध्येतील एका जमीन खरेदीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेत्यांनी या व्यवहाराच्या चौकशीची भूमिका घेतली. त्या भूमिकेविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना भवनसमोर फटकार मोर्चा काढला होता. भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर मर्यादित संख्येत आंदोलनाला परवानगी देण्यात आली होती. काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेली शिवसेना हिंदुत्व विसरली, धर्मनिरपेक्ष बनलेली शिवसेना आता खोटे आरोप करत हिंदुत्वाच्या आस्थेवरही आघात करत असल्याचा आरोप भाजपने केला.