नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी विविध राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी कोरोनासंदर्भात ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्या-त्या राज्यांचे मुख्यमंत्रीही या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Mamata Banerjee) हजर होत्या. या बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'ना लस, ना धोरण, आम्हाला बोलूच दिले नाही', असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ममता बॅनर्जींच्या या आरोपाला आता केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ममता बॅनर्जी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलूच दिले नाही, असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. (bjp retaliated on mamta ravi shankar prasad says mamata conduct shameful)
"आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरोधात चांगल्या कामांची माहिती शेअर करण्यासाठी काही राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आचरण आज अत्यंत अशोभनीय होते. त्यांनी संपूर्ण बैठकीला एक प्रकारे पटरीवरुन उतरवण्याचे काम केले", असे रविशंकर प्रसाद म्हणाले.
याचबरोबर, "ममता बॅनर्जींनी आरोप केला की फक्त भाजपाशासित राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनाच बोलावले जाते. पण, पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत आंध्र प्रदेश, केरळ, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांनीही आपले मत मांडले. ममता बॅनर्जी यांनी 24-परगनाच्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलू दिले नाही. त्या म्हणाल्या की जिल्हाधिकाऱ्यांना काय माहिती, त्यांच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे", असे सांगत रविशंकर प्रसाद यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.
'आम्हाला कोरोना लसीची मागणी करायची होती, मात्र बोलूच दिले नाही'मोदींसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. "भाजपाचे काही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी आपआपले मुद्दे मांडले. मात्र आम्हाला बोलण्याची संधी मिळाली नाही. सर्व मुख्यमंत्री केवळ गप्प बसून होते. कोणीही काहीही बोलले नाही. आम्हाला कोरोना लसीची मागणी करायची होती, मात्र बोलूच दिले नाही" असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.