भोपाळ: गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेल आणि इंधनदर वाढीबाबत विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहे. काँग्रेसने अनेक ठिकाणी आंदोलनेही करत आहेत. मात्र, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याबाबत केंद्र सरकार उत्सुक नसल्याचे सांगितले जात आहे. यातच आता भाजप खासदार प्रज्ञा सिंह यांनी हास्यास्पद विधान केले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे हा काँग्रेसचाच प्रोपगंडा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (bjp sadhvi pragya says fuel price hike and inflation nothing but congress mindset and propaganda)
भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या भोपाळ महापालिकेच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. नवीन बसेसचे लोकार्पण आणि नव्या पंपहाऊसचे उद्घाटनाचा कार्यक्रम होता. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून हे उद्घाटन केले.
“पूर येणे हा दैवी प्रकोप, पीडितांना भेटायला जाणार नाही”; केंद्रीय मंत्र्यांचा अजब दावा
महागाई वगैरे काही नाहीये
हे लोक जे प्रोपगंडा पसरवत आहेत की पेट्रोल महाग झालेय, डिझेल महाग झालेय. महागाई वगैरे काही नाही, ही काँग्रेसची मानसिकताच आहे. फुकटचा प्रोपगंडा आहे, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला आहे. याला काँग्रेसने प्रत्युत्तर दिले असून, पूर आला... काँग्रेसमुळे? महागाई आली... नेहरुंच्या भाषणामुळे? महागाईची अडचण आहे तर अफगाणिस्तानात जा? आणि आता प्रज्ञा सिंग ठाकूर म्हणतायत की महागाई वगैरे काही नाही, ही काँग्रेसची मानसिकताच आहे, त्यांचा प्रोपगंडा आहे? यांचे मानसिक संतुलन तपासायला हवे, असे ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी केले आहे.
दरम्यान, यापूर्वी मी स्वत: गोमुत्राचा अर्क घेते. त्यामुळेच मला कोणत्याही प्रकारचे औषध घ्यावे लागत नाही. मला कोरोनाही झाला नाही. सर्व लोकांनी स्वदेशी गायीचे पालन केले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने पिंपळ, वड आणि तुळस लावली पाहिजे. असे केल्यास ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असा दावाही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला होता.