नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सातत्याने टीकास्त्र सोडलं आहे. विविध मुद्द्यावरून हल्लाबोल करत आहे. मात्र आता भाजपाने पलटवार केला असून राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाने राहुल यांचा उल्लेख लाहोरी असा केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींवर घणाघाती टीका केली आहे. तसेच "इंडियन नॅशनल काँग्रेसही लवकरच पाकिस्तान नॅशनल काँग्रेस होईल" असं देखील पात्रा यांनी म्हटलं आहे.
"भारताने राहुल गांधी यांचं नावं बदललं आहे. ते राहुल गांधी नाहीत, राहुल लाहोरी आहेत. कारण हा भाजपा व काँग्रेस असा विषय नाही. हा विषय भारत विरुद्ध पाकिस्तान असा आहे. बदनाम देशासोबत काँग्रेस भारताला का बदनाम करते आहे? भारत कोट्यवधी लोकांचा देश आहे, जिथे सर्व आनंदानं जगत आहेत. धर्माच्या कोणत्याही सीमा नाहीत. भारत एक लोकशाही देश आहे. तुम्ही पाकिस्तानशी तुलना करता. भारताविषयी तक्रारी करता. भारत भीक मागणाऱ्यांचा देश आहे असं म्हणता. याच वेगाने काम सुरू राहिलं, तर इंडियन नॅशनल काँग्रेसही लवकरच पाकिस्तान नॅशनल काँग्रेस होईल" असं संबित पात्रा यांनी म्हटलं आहे.
भाजपाच्या संबित पात्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतच एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच RahulLahori हा हॅशटॅग देखील वापरला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. राहुल गांधी यांनी शुक्रवारी (16 ऑक्टोबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने भारतापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे कोरोना परिस्थिती हाताळल्याचं म्हटलं होतं. "भाजपा सरकारची आणखी एक जबरदस्त कामगिरी. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने आपल्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे कोरोना परिस्थिती हाताळली आहे" असं ट्विट राहुल यांनी केलं होतं. यासोबत राहुल यांनी आयएमएफच्या आकड्यांच्या संदर्भ देखील दिला होता. त्यानंतर भाजपाने निशाणा साधला आहे.
"जवानांसाठी नॉन बुलेटप्रुफ ट्रक आणि पंतप्रधानांसाठी 8400 कोटींचं विमान", राहुल गांधींचा घणाघात
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींवर पुन्हा निशाणा साधला होता. "आपल्या जवानांना नॉन बुलेटप्रुफ ट्रकांमधून शहीद होण्यासाठी पाठवलं जात आहे आणि पंतप्रधानांसाठी 8400 कोटी रुपयांचं विमान मागवलं जात आहे, हा न्याय आहे का?" असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला होता. राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका ट्रकमध्ये जवान बसलेले दिसत आहेत. ते एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. यामध्ये एका जवानांनी 'नॉन बुलेटप्रुफ गाड्यांमधून पाठवून आपल्या जीवासोबत खेळलं जातं आहे' असं म्हटलं आहे. त्यामुळे राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. याआधी त्यांनी ट्विटरवरून टीकास्त्र सोडलं होतं. "पंतप्रधानांनी आपल्यासाठी 8400 कोटी रुपयांचं विमान खरेदी केलं. एवढ्या पैशांत तर सियाचिन लडाख सीमेवर तैनात आपल्या जवानांसाठी कितीतरी गोष्टी खरेदी करता आल्या असत्या. गरम कपडे 30 लाख, जॅकेट-ग्लोव्हज 60 लाख, बूट 67 लाख 20 हजार, ऑक्सिजन सिलिंडर 16 लाख 80 हजार, पंतप्रधानांना केवळ स्वत:च्या प्रतिमेची काळजी आहे सैनिकांची नाही" असं म्हटलं होतं.