नवी दिल्ली - अफगाणिस्तानात मोठा हिंसाचार सुरू आहे. तालिबाननेअफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केला. राजधानी काबुल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानींनी संसद, राष्ट्रपती भवनावर कब्जा केला. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ माजली आहे. याच दरम्यान पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराची तुलना भाजपाच्या काही नेत्यांनी आता तालिबान्यांशी केली आहे. पश्चिम बंगालमधील भाजपाच्या महासचिवांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "लेडी तालिबान" म्हणत निशाणा साधला आहे.
भाजपाचे बंगाल राज्याचे महासचिव सायंतन बसू (Sayantan Basu) यांनी "लेडी तालिबानला (Lady Taliban) पाहायचं असेल, तर कालीघाटमध्ये या" अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जींवर बोचरी टीका केली आहे. राज्यात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. "तूणमूल सत्तेत आल्यापासून विरोधी पक्षांच्या सर्व अधिकारांवर गदा आणली जात आहे. बंगालमध्येही तालिबानी शासनच सुरू आहे. जर कोणाला तालिबान पाहायचं असेल, तर तिकीट काढून काबुलला जाण्याची गरज नाही. येथे कालीघाटमध्येच तुम्ही लेडी तालिबानला पाहू शकता" असं म्हटलं आहे.
सायंतन बसू यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं उघडपणे नाव घेतलं नसलं तरी कालीघाटमध्ये मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे. भाजपा नेत्याच्या या विधानावर तृणमूल काँग्रेसचे महासचिव पार्थ चॅटर्जी (Parth Chatterjee) यांनी उत्तर दिलं आहे. भाजपा नेत्यांनी अशी विधाने केल्यास तृणमूल ते सहन करणार नाही. याचं आम्ही वेळीच योग्य उत्तर देऊ असं चॅटर्जी यांनी म्हटलं आहे. तर काही नेत्यांनी या विधानाचा निषेध करून भाजपावर जोरदार टीका केली आहे. सायंतन बसू यांच्या या विधानाने पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"ज्या लोकांना भारतात भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात निघून जावं, तिथे पेट्रोल पण स्वस्त आहे"
काही दिवसांपूर्वी भाजपाच्या एका आमदाराने एक वादग्रस्त विधान केलं होतं. ज्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला असून राजकारण तापलं होतं. "ज्या लोकांना भारतात राहायची भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात निघून जावं, तिथे पेट्रोल पण स्वस्त आहे" असं आमदाराने म्हटलं. हरिभूषण ठाकूर (BJP Haribhushan Thakur) असं या भाजपा आमदाराचं नाव असून त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण झाला. ठाकूर यांनी "अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र ज्या लोकांना येथे देशात राहायची भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात जावं, तिथे पेट्रोल देखील स्वस्त आहे" असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावरून अनेकांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.