मुंबई – बुधवारी दादर येथे झालेल्या शिवसेना-भाजपा राड्याचे पडसाद राजकीय वर्तुळात दिवसभर उमटत आहेत. राम मंदिर जमीन खरेदीत कथित घोटाळ्याचा आरोपावरून शिवसेना-भाजपा कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी शिवसैनिकांनी पोलिसांना हाताशी धरून भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजपाने केला. त्यानंतर आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आव्हानांची मालिका सुरू झाली आहे.
शिवसेनेला जशास तसं उत्तर देऊ म्हणणाऱ्या भाजपाच्या सो कोल्ड नेत्यांनी फक्त वेळ आणि तारीख सांगावी आम्ही पुन्हा मैदानात येऊ असा इशारा शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी दिला होता. यावर भाजपाच्या मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राडेबाजी ही शिवसेनेची पहिल्यापासून प्रवृत्ती आहे मात्र आता महिलांवर हात उचलणे ही शिवसेनेची संस्कृती झाली आहे. तुम्ही राड्याची तारीख सांगा, आम्ही आमच्या विकासकामांच्या तारखा सांगतो असं चँलेज शीतल देसाईंनी शिवसेनेला दिलं आहे.
तसेच शिवसेनेला त्यांच्या नव्या दोस्तांचा वाण नाही तर गुण लागला. लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा हक्क आहे. परंतु भाजपाच्या आंदोलनाला शिवसेनेने हिंसक मार्गाने विरोध केला. मुद्दे संपले की, गुद्दे सुरू होतात. हिंसक प्रत्युत्तर दिल्यास भाजपाचा कोणताही कार्यकर्ता अरेला कारे करणारच असा इशाराही शीतल देसाई यांनी शिवसेनेला दिला आहे.
शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक, त्यावर चाल कराल तर...
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना भवनावर चाल करण्याचा प्रयत्न केला. त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला. शिवसेना भवन ही केवळ राजकीय वास्तू नाही तर ती महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिले, चाल करून आले तर त्यांना शिवप्रसाद मिळणारच. आता काल मिळालेल्या शिवप्रसादावरच थांबा, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असा इशाराच संजय राऊत यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि भाजपाला दिला.
नितेश राणेंनीही शिवसेनेला डिवचलं
सेनाभवनासमोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना जाऊन सांगा की, तुमचा उद्धव आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात. भाजपाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांना मानले, अशा शब्दात नितेश राणे यांनी सेनाभवनसमोर शिवसैनिकांशी भिडणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचेही नितेश राणे यांनी कौतुक केले आहे.