- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातून जाणाऱ्या श्रीराम चौक ते व्हिटीसी ग्राऊंडमार्गे मोर्यानगरी रस्त्यातील मोर्यानगरी चौक ते नागरणी मंदिर या दरम्यानच्या रस्त्याची दुरावस्था झाली. रस्त्याच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीवरून भाजपा-शिवसेनेत जुंपली असून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी श्रेयासाठी धडपडत केल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे नागरिक, वाहनचालक रस्त्याच्या दुरावस्थेमुळे हैराण झाले.
उल्हासनगर कॅम्प नं-४, मार्केटमधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने, महापालिकेने काही वर्षांपूर्वी श्रीराम चौक ते व्हिटीसी मैदान मार्गे मोर्यानगरी रस्ता विकसित केला. त्या रस्त्यावरून जड वाहतूक फिरविण्यात आली. मात्र व्हिटीसी ग्राऊंड मार्गे मोर्यानगरीकडे जाणाऱ्या रस्त्याचा काही भाग पूर्वी आशेळे व माणेरे गाव हद्दीतून जातो. आता या रस्त्याचा भाग कल्याण महापालिकेच्या हद्दीत येतो.
दोन महापालिका हद्दीच्या वादातून या रस्त्याची दुरुस्ती व पुनर्बांधणी रखडल्याचे बोलले जात आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी दोन दिवसापूर्वी दुरावस्था झालेल्या रस्त्याच्या डबक्यात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होम हवन करून कल्याण महापालिकेचे लक्ष वेधले. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त होमहवन केल्याने, शहर शिवसेनेच्या जिव्हारी लागले.
शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, महापौर लिलाबाई अशान, उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी बुधवारी मोर्यानगरी रस्त्याला भेट देऊन, आमदार गणपत गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्याच्या दुरावस्थे बाबत होमहवन केल्या बाबत नाराजी व्यक्त केली.
तसेच आमदार गायकवाड यांच्यावर तोंडसुख घेतले. आमदारांनी स्वतःच्या निधीतून आजपर्यंत 0 रस्त्याची दुरुस्ती का केली नाही. असा प्रश्न करून येत्या निवडणुकीत त्यांची उत्तर पूजा करणार असल्याचा इशारा दिला. तसेच कल्याण महापालिकेने रस्त्याच्या पुनर्बांधणी साठी १२ कोटींची तरतूद केली. प्रत्यक्षात महापालिकेने जुनी निविदा रद्द करून १७ कोटीची निविदा काढल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी नव्याने केला आहे.
मोर्यानगरी रस्त्यावर शहरातील वाहतूक शहरातून जाणाऱ्या श्रीराम चौक ते व्हिटीसी ग्राऊंड मार्गे मोर्यानगरी रस्त्यावरून बहुतांश वाहने शहरातील आहेत. रस्त्यातील मोर्यानगरी चौक ते नागराणी मंदिर हाच रस्त्याचा तुकडा कल्याण महापालिकेत येत असले तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या परिसराला पाणी, साफसफाई व इतर नागरी सुविधा उल्हासनगर महापालिका देत आहे.