सरकार तिघांचं, मग नाव का फक्त दोघांचं?; काँग्रेसच्या पोस्टरबाजीवर भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 10:14 AM2020-08-31T10:14:16+5:302020-08-31T10:16:49+5:30
महाविकास आघाडीतील नाराजी नाट्याची धूसफूस थेट पोस्टरमधून समोर आल्याने राज्य सरकारच्या तिन्ही पक्षात काही आलबेल नाही हे दिसून येते.
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षाचा एकमेकांशी संवाद नाही असा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येत होता. त्याचाच प्रत्यय ठाण्यात काँग्रेसने केलेल्या पोस्टरबाजीतून पाहायला मिळाला. ठाकरे सरकारवर नाराज होत ठाण्यात काँग्रेसने थेट महाविकास आघाडी सरकारविरोधात पोस्टरबाजी करत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सरकार तिघांचं, मग नाव का फक्त दोघांचं? असं सांगत राज्य सरकारच्या नियोजित प्रकल्पांचे श्रेय काँग्रेसलाही जाते असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला नसता तर लोकांचे जनकल्याण करणारे ठाकरे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले असते का? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीतील नाराजी नाट्याची धूसफूस थेट पोस्टरमधून समोर आल्याने राज्य सरकारच्या तिन्ही पक्षात काही आलबेल नाही हे दिसून येते. सरकारच्या प्रकल्पाची जाहिरात करताना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो लावण्यात येतात यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. हे पहिल्यांदाच नाही तर यापूर्वीही युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनीही ठाकरे सरकारवर यावरुन निशाणा साधला होता.
महाविकास आघाडीच्या या नाराजी नाट्यावरुन भाजपा आमदार राम कदम यांनी टोला लगावला आहे. ठाण्यात काँग्रेसची पोस्टरबाजी, सरकार तिघांचं मग नाव का फक्त दोघांचं असा प्रश्न ठाणे काँग्रेसने लावलेल्या बॅनरमधून विचारण्यात आला आहे. तुमच्या तीन पक्षांच्या आपापसातील भांडणांमध्ये महाराष्ट्राचे वाटोळे झाले अशी टीका त्यांनी केली आहे.
ठाण्यात #कांग्रेसची पोस्टरबाजी
— Ram Kadam (@ramkadam) August 31, 2020
सरकार तिघांचं मग नाव का फक्त दोघांचं..? असे सवाल ठाणे काँग्रेसने लावलेल्या बॅनरवर विचारण्यात आलेत. तुमच्या तीन पक्षाच्या आपसातील भांडणांमध्ये महाराष्ट्राचं वाटोळं केलंत @INCMaharashtra@MumbaiNCP@ShivsenaCommspic.twitter.com/ZKwEeBfSjM
काय आहे प्रकरण?
राज्यात महाआघाडीचे सरकार असून, शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना व राष्ट्रवादीने मिळून सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे ठाणे शहर विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांच्या पोस्टर, बॅनरवर काँग्रेसच्या नेत्यांचेही मोठे फोटो लावणे अपेक्षित आहे. पण शिवसेना, राष्ट्रवादी लावत असलेल्या पोस्टर, बॅनरवर फक्त पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचेच फोटो असतात. काँग्रेस नेत्यांचे फोटो लावले जात नसल्याबद्दल ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली होती.
शहरात पोस्टर, बॅनर, कटआऊटची स्पर्धा सुरू आहे. त्या विषयी पत्रकारांनी चव्हाण यांना बोलते केले असता, त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी या मित्रपक्षांवर टीका केली. राज्याच्या सत्तेतील या तिन्ही पक्षांच्या सहमतीने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले जातात. ठाणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाच्या पोस्टर, बॅनरवर काँग्रेस नेत्यांच्या व्यतिरिक्त फक्त शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह या दोन मंत्र्यांचेच मोठे फोटो लावले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. यावरून राज्याच्या सत्तेतील या तिन्ही पक्षांमध्ये शहरात सुरू असलेल्या पोस्टर, बॅनरच्या स्पर्धेवरून आता वाद वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.