नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "कोरोना संसर्गासाठी मोदी-शहांना जबाबदार ठरवणं ममतांचे 'संस्कार'" असं म्हणत इराणी यांनी निशाणा साधला आहे, "पश्चिम बंगालमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येसाठी ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना दोषी ठरवत आहेत. यातून त्यांचे संस्कार दिसतात" अशा शब्दांत त्यांनी ममता बॅनर्जींवर बोचरी टीका केली आहे.
"मला हे ऐकून धक्काच बसला की, कोरोना महामारीसाठी त्या मोदीजी आणि अमित शहा यांना जबाबदार ठरवत आहेत. पण हेच ममता बॅनर्जी यांचे संस्कार आहेत. मोदीजी त्यांचा उल्लेख दीदी म्हणून करतात आणि त्या आमच्या नेत्यांसाठी सार्वजनिक व्यासपीठावरून अपशब्दांचा वापर करतात" असं म्हणत स्मृती इराणी यांनी ममता बॅनर्जींवर टीकास्त्र सोडलं आहे. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भाजपावर (BJP) गंभीर आरोप केला आहे. त्यावर आता इराणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं मात्र भाजपामुळे संसर्ग पुन्हा वाढला" असं म्हणत ममतांनी भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाने प्रचारासाठी बाहेरील राज्यांतून माणसं आणल्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असा आरोप आता ममता बॅनर्जी यांनी केला आहे. एका प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. "लसीकरणासंदर्भातील अनेक राज्यांच्या विनंतीला केंद्र सरकार प्रतिसाद देत नाही. नागरिकांचे लसीकरण केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. काही दिवसांपूर्वी आम्ही कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते. मात्र, भाजपाने पश्चिम बंगालमध्ये प्रचार करण्यासाठी बाहेरील राज्यांतून माणसं बोलावली होती आणि त्यामुळे येथील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी श्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान करण्यात आलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. कूचबिहारच्या सितालकुचीमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे आपापसात भिडले. या हाणामारीत अनेक लोक जखमी झाले होते. गोळीबारामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 4 जण जखमी झाले होते. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपा आणि अमित शहांवर (Amit Shah) जोरदार हल्लाबोल केला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी "कूचबिहारचा गोळीबार पूर्वनियोजित होता. गृहमंत्री अमित शहांच्या निर्देशावर कट रचण्यात येतो" असा गंभीर आरोप केला होता. अमित शहांच्या राजीनाम्याची देखील त्यांनी मागणी केली. सीआयएसएफवर मतदानासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या मतदारांवर गोळीबार करण्याचा आरोप केला. या घटनेचा कट केंद्रातून रचण्यात आल्याचा आरोप करताना 'अमित शहांनी या घटनेचं उत्तर द्यावं' असं ममता बॅनर्जींनी म्हटलं होतं.