विधानसभा निवडणुकीपासून भाजपावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja munde) यांची राज्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भेट घेतली. यावेळी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Chandrakant Patil met Pankaja munde.)
विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून डावलल्यामुळे नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय स्तरावरील पद देण्यात आले होते. यानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडेंचे नाव चर्चेत असतानाही वगळल्याने बीड जिल्ह्यातील 80 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे देत पंकजा मुंडेंची मुंबईत भेट घेतली होती. यावेळी पंकजा यांनी राजीनामे फेटाळत असल्याचे सांगत राज्यातील नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच मोदी, शहा, नड्डा हे माझे नेते आहेत, असे म्हटले होते.
भाजपाने बोलावलेल्या ओबीसी आरक्षणाच्या बैठकीतही पंकजा यांनी पाठ फिरविली होती. या घडामोडींवर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांची गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयात भेट घेतली. मंगळवारी सायंकाळी ही भेट झाली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर चंद्रकांत पाटलांनी एकाच पक्षातील दोन नेते भेटले तर त्यात वेगळे काय असा सवाल करत ही गुप्त भेट नव्हती, तर सर्वांसमोर झाल्याचे ते म्हणाले.