नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पेगासस फोन टॅपिंग (Pegasus Spyware), हॅकिंगचा गौप्यस्फोट करण्यात आल्याने देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी, मोदी सरकारचे मंत्री आणि मोठमोठे पत्रकारांची नावे यामध्ये असल्याने काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर भाजपाने हे आरोप फेटाळले आहेत. मात्र, गृहमंत्री अमित शहा यांना यामागे वेगळाच संशय येत आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या बरोबर आधी हा रिपोर्ट आला आहे. यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय शहा यांनी व्यक्त केला आहे. याच दरम्यान आता भाजपा खासदाराने थेट सवाल केला आहे.
भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी "जर यामागे मोदी सरकार नाही तर मग कोण?" असा प्रश्न विचारला आहे. सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी मोदी सरकारने याबाबत लोकांना माहिती द्यावी अशी मागणी देखील केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "पेगासस स्पायवेअर ही एक व्यावसायिक कंपनी असून कंत्राट दिल्यानुसार काम करते हे स्पष्ट आहे. त्यामुळे भारतातील ऑपरेशनसाठी त्यांना पैसे कोणी दिले हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर भारत सरकार नाही तर मग कोण? भारतातील जनतेला हे सांगणं मोदी सरकारचं कर्तव्य आहे" असं सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
फोन हॅकिंग रिपोर्टवर अमित शहांना वेगळाच संशय; ठेवले 'टायमिंग'वर बोट
काही लोक देशाच्या लोकशाहीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा उद्देश भारताचा विकास थांबविणे हा आहे. मात्र, या उद्देशांना सरकार यशस्वी होऊ देणार नाही, असे शहा यांनी म्हटले आहे. संसदेचे अधिवेशन सुरू झाले आहे. याचा घटनाक्रम देशाने पाहिला आहे. लोकशाहीला बदनाम करण्यासाठी अधिवेशनाच्या बरोबर आदल्या दिवशी रात्री उशिरा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अपमानीत करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करत आहेत, असा आरोप शहा यांनी केला आहे. फोन हॅकिंग माझ्या नावाशी या आधीही अनेकदा जोडण्यात आले आहे. मात्र, आज मी गंभीरतेने सांगू इच्छितो की, हा तथाकथित रिपोर्ट लीक होण्याची वेळ आणि संसदेचे अधिवेशन, याची क्रोनोलॉजी समजून घ्या, असे म्हणत शहा यांनी या टायमिंगवरच बोट ठेवले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी, विरोधी पक्षांतील अन्य काही नेते, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, अश्विनी वैष्णव व प्रल्हाद पटेल हे दोन केंद्रीय मंत्री, न्यायाधीश, पत्रकार यांच्यासहित अनेक मान्यवरांचे फोन टॅप करून त्यांच्यावर मोदी सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत सोमवारी गदारोळ केला. भाजप ही भारतीय जाजूस पार्टी असल्याची टीका काँग्रेसने केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र इस्रायली स्पायवेअर पेगॅससद्वारे पाळत ठेवल्याच्या आरोपांचा केंद्र सरकारने इन्कार केला आहे. या प्रकरणावरून संसदेचे कामकाज रोखून धरण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला.