मुंबई – हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सभागृहात जोरदार कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला. अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्या हक्कभंग प्रकरणावरुन विधानसभेत महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपा आमनेसामने आले, विधानसभेत मागील अधिवेशनात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता, हा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवण्यात आला, आज या समितीचा अहवाल सादर करण्यासाठी सभागृहात मुदतवाढ देण्यात आली.
विशेष हक्कभंग प्रस्तावावरून भाजपा नेते सुधीर मुनगुंटीवार आणि शिवसेना मंत्री अनिल परब यांच्या खडाजंगी झाली, वैयक्तिक टीका-टिप्पणी केल्यास हक्कभंग कसा होऊ शकतो असा सवाल भाजपाने केला, तर आमदारांना विशेषाधिकार दिले कशाला? तुम्ही कधी हक्कभंग वापरले नाही का? मागील ५ वर्षात किती हक्कभंग मांडले हे दाखवू का? सभागृह असताना कोर्टात जायचं कशाला? असा सवाल अनिल परब यांनी केला.
तर मागील विधानसभेत पंकजा मुंडे यांनी एका लक्षवेधीला उत्तर दिलं त्यात जे विधान नव्हतं त्याबद्दल बातमी दिली होती, ते विधानसभेसंदर्भात होतं, प्रत्येक आमदाराला विशेष अधिकार दिला आहे. मात्र विधानसभेतील खोटी माहिती बाहेर दिली जाऊ शकत नाही, तसं झालं असेल तर हक्कभंग असू शकतो, मात्र एखाद्या वृत्तपत्राने टीका-टीप्पणी केली तर त्यावर हक्कभंग आणायचा का? यावर विचार होणं गरजेचे आहे, जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांबद्दल काही विधान केले असेल तर तो राज्याचा अवमान आहे तर हा नियम विरोधी पक्षनेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही लागू होतो आणि असा नियम झाला तर सभागृहात १० हजार हक्कभंग दाखल होऊ शकतात असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
दरम्यान, माझे कुटुंब माझी जबाबदारी यावरूनही मुनगंटीवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमटा काढला. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, माझे पेपर आणि माझी मुलाखत, माझे पोलीस आणि माझा एफआयआर असा शब्दात मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली. पुरवणी मागण्यावेळी सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलत होते, त्यावेळी त्यांनी पालघर साधु हत्येचा मुद्दाही उपस्थित केला. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात साधुंची हत्या कशी काय होऊ शकते? तुम्ही संवेदनशीलतेने काम करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री विरोधकांच्याबाबत घृणास्पद भावना ठेऊन वागतायेत हे योग्य नाही असंही मुनगंटीवार यांनी सांगितले.
अजित पवारांनी स्वीकारलं चँलेज
पुरवणी मागण्या, हक्कभंग प्रस्ताव अशा विविध विषयांवर सुधीर मुनगंटीवारांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, आमदारांच्या वाहन चालकांना पैसे दिले नाहीत, दिव्यांगाचे पैसे दिले नाहीत, परंतु मुख्यमंत्री कार्यालयात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पैसे दिले असा आरोप सुधीर मुनगंटीवारांनी केला. त्यावेळी अजित पवार उत्तर देण्याचा प्रयत्न करत असताना माझ्या भाषणात अडथळा आणतो तो पुन्हा कधी निवडून येत नाही असं मुनगंटीवार म्हणाले त्यावर तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा असं चॅलेंज अजित पवारांनी सुधीर मुनगंटीवारांना दिलं.