नवी दिल्ली- लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येते आहे. तस तसे राजकीय पक्षांची बेरीज-बजाबाकी सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपानं पुन्हा एकदा आपली ताकद किती हे जाणून घेण्यासाठी अंतर्गत सर्व्हेसुद्धा केला आहे. परंतु या सर्व्हेतून आलेले निष्कर्ष भाजपाची झोप उडवणारे आहेत. भाजपाला 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपाच्या हिंदी पट्ट्यातील जवळपास सर्वच राज्यांतील जागांमध्ये घट होणार आहे.विशेष म्हणजे भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. भाजपानं केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेशात भाजपाला 51 जागांचं नुकसान होणार आहे. 2014च्या निवडणुकीत भाजपानं दमदार विजय मिळवत उत्तर प्रदेशातल्या 80 पैकी 71 जागा जिंकल्या होत्या. परंतु भाजपाच्या ताज्या सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशात पक्षाला 20 जागांवरच समाधान मानावं लागणार आहे. उत्तर प्रदेशात बसपा आणि सपाची झालेली आघाडी ही भाजपाच्या जागा घटवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीची आघाडी झाल्यामुळे यंदा राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे. या आघाडीनंतर लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष बसपापेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.उत्तर प्रदेशातल्या 14 मोठ्या शहरांतील 8 जागांवर समाजवादी पार्टी आणि 6 जागांवर बसपा निवडणूक लढवू शकते. या 14 जागांपैकी तीन जागांवर 2014च्या निवडणुकीत काँग्रेस दोन नंबरवर होती. यातील तीन जागांवर सपा विजय मिळवू शकते. तर तीन जागांवर काँग्रेस जिंकण्याची शक्यता आहे.सपा आणि बसपानं आघाडी करतानाच अमेठी आणि रायबरेलीच्या जागा काँग्रेससाठी सोडल्या आहेत. उर्वरित 38-38 लोकसभा जागांचं वाटप केलं होतं. जागांचं वाटप हे दोन्ही पक्षांचं त्या त्या प्रभागात असलेल्या ताकदीनुसार करण्यात आलं आहे, असंही सपाच्या नेत्यानं सांगितलं आहे. तर इतर पक्षांनीही या आघाडीत सहभागी व्हावं, मोर्चेबांधणी आता केली जात आहे. सपा मुरादाबाद, गाझियाबाद, लखनऊ, कानपूर, झांसी, अलाहाबाद, गोरखपूर आणि वाराणसीमध्ये लढण्याची शक्यता आहे. काँग्रेसने भाजपाला रोखण्यासाठी प्रियंका गांधी यांना राजकारणात उतरवले आहे. तसेच त्यांना पक्षाचे सरचिटणीसपद देऊन त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपविली आहे.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची छबी प्रियंका गांधी यांच्यामध्ये दिसत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आलेला आहे. त्याचप्रमाणे मतदारांवरदेखील प्रियंका यांचा प्रभाव आहे. त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता बळावली आहे. प्रियंका यांच्या प्रभावी वक्तृत्वाचेही मतदारांना आकर्षण आहे.‘प्रियंका फॅक्टर’ काँग्रेससाठी किती लाभदायी ठरतो, याबाबतची उत्सुकता असताना एका सर्वेक्षणात प्रियंकामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मतांचा टक्का नक्कीच वाढेल, असा अंदाज वर्तविला आहे. प्रत्यक्षात प्रियंका गांधी यांची जादू किती चालते हे पाहणे औैत्सुक्याचे ठरणार आहे.
यूपीतल्या 51 जागांसह बहुमतही हुकणार, भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेनं मोदी-शहांची झोप उडाली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 11:33 AM
या सर्व्हेतून आलेले निष्कर्ष भाजपाची झोप उडवणारे आहेत.
ठळक मुद्देभाजपाच्या हिंदी पट्ट्यातील जवळपास सर्वच राज्यांतील जागांमध्ये घट होणार आहे. भाजपाला 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपाच्या ताज्या सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशात पक्षाला 20 जागांवरच समाधान मानावं लागणार आहे.