पटणा – बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर गंभीर आरोप लावला आहे. जेलमधूनच लालू प्रसाद यादव भाजपाच्या आमदारांना फोन करून महाआघाडीत येण्यासाठी आमिष दाखवत आहेत, बिहार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच राज्यात खळबळ माजली आहे.
सुशील मोदी यांनी ऑडिओ क्लीप जारी केली आहे, यात लालू प्रसाद यादव हे जेलमधून भारतीय जनता पार्टीचे आमदार लल्लन पासवान यांच्याशी फोनवरुन संवाद साधत आहेत, यात पासवान यांना लालूंनी मंत्रिपदाची ऑफर देत महाआघाडीत सामील होण्याची गळ घालत आहेत. लल्लन पासवान हे पीरपैंती विधानसभेच्या जागेवरुन निवडून आले आहेत.
काय आहे या ऑडिओ क्लीपमध्ये?
सुशील मोदी यांच्याकडून ऑडिओ क्लीप प्रसिद्ध करण्यात आली आहे, यात लालू प्रसाद यादव भाजपाच्या आमदाराला सांगत आहेत की, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी गैरहजर राहावं, कोरोना झालाय असं पक्षाला सांग, याला उत्तर देताना भाजपा आमदाराने मी पक्षात असल्याने मला अडचणीचे ठरेल. तर लालू प्रसाद यादव आमदाराला महाआघाडीसोबत आल्यास मंत्रिपद देऊ असं आश्वासन देत असल्याचं ऐकायला मिळत आहे.
लालू प्रसाद यादव यांनी ज्या भाजपा आमदाराला फोन केला, त्या लल्लन पासवान यांचा दावा आहे की, जेव्हा फोन आला तेव्हा मी सुशील मोदी यांच्यासोबत होतो, त्यावेळी पीएने लालू यादव यांचा फोन आल्याचा निरोप दिला, जेलमधून फोन आल्याने सुरुवातीला धक्का बसला, परंतु त्यानंतर माझं आणि लालूजींच बोलणे झाले. ही ऑडिओ क्लीप प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपा आमदार नीरज सिंह यांनी लालू यादव यांना रांचीहून तिहार जेलमध्ये रवानगी केली पाहिजे अशी मागणी केली, तर दुसरीकडे आरजेडीकडून सुशील मोदींचे आरोप फेटाळून लावले आहेत,
आरजेडीचे म्हणणं आहे की, सुशील कुमार मोदी यांनी जे आरोप केलेत ते खोटे आहेत, खूप लोक लालू प्रसाद यादव यांचा आवाज काढू शकतात असं त्यांनी सांगितले आहे, मंगळवारी सुशील मोदी यांनी ट्विट करत एक नंबर जारी केला होता, या नंबरवरुन लालू प्रसाद यादव भाजपा आमदारांना फोन करत असल्याचा दावा त्यांनी केला, इतकचं नाही तर ज्यावेळी सुशील कुमार मोदींनी या नंबरवर फोन लावला होता, तेव्हा लालू यादव यांनीच नंबर उचलला असल्याचं ते म्हणाले. बिहार विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे, एनडीएकडून भाजपाचे विजय सिन्हा आणि विरोधी पक्षाकडून आरजेडीचे बिहारी चौधरी मैदानात आहेत, बिहारमध्ये ५ दशकानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे.