कोलकाता: देशात कोरोनाची दुसरी लाट अद्यापही पूर्णपणे ओसरलेली नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशाराही देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. लसींच्या कमतरतेमुळे देशव्यापी लसीकरण मोहिमेचा वेग मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांकडून केंद्र सरकारला लसींच्या पुरवठ्याबाबत विनंती केली जात असताना, एकीकडे राज्यात लसींचे ९ लाख डोस फुकट घालवले आहेत आणि दुसरीकडे आता केंद्रातील मोदी सरकारकडे आणखी कोरोना लसींची मागणी करायची, अशी टीका करण्यात आली आहे. (bjp suvendu adhikari criticised mamata banerjee govt over corona vaccine)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा एकदा कोरोना लसीसंदर्भात तक्रार केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले आहे. पश्चिम बंगालमध्ये लसीचा पुरवठा वाढविला गेला नाही, तर कोरोना महामारी अधिक गंभीर होऊ शकते. एवढेच नाही, तर पश्चिम बंगालला कोरोना लसीच्या जवळपास १४ कोटी डोसची आवश्यकता आहे, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. यावरून भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधला आहे.
सावधान! डेल्टापेक्षाही अधिक घातक कोरोनाचा व्हेरिएंट येणार? लसीही निष्प्रभ ठरणार
ममता बॅनर्जी यांची धोरणे पक्षपाती
ममता बॅनर्जी यांच्या सरकारने राज्यात राबवलेली धोरणे पक्षपाती आहेत. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. नागरिकांना लस घेण्यात मोठ्या अडचणी येत आहेत, असे सांगत ममता बॅनर्जी सरकारने कोरोना लसीचे ९ लाख डोस फुकट घालवल्याचा दावाही सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. तसेच आपल्या आधीच्या दाव्यांपासून ममता बॅनर्जी यांनी घुमजाव केले आहे. सरकारी यंत्रणांच्या फोलपणाचे खापर केंद्रातील मोदी सरकारवर फोडले जात आहे, अशी टीकाही अधिकारी यांनी केली. तृणमूल काँग्रेसच्या सरकारने काही लाख लसी खरेदी केल्या आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम राज्यातील १० कोटी जनतेवर पडत आहे. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जवळच्या लोकांना लसींसाठी पायघड्या घातल्या जात आहेत, तर सामान्य जनता रांगेत ताटकळत उभी राहते, असा दावा अधिकारी यांनी केला आहे.
काय सांगता! वय वर्षे १२ अन् जेवणात खातो तब्बल ४० चपात्या; डॉक्टरही चक्रावले
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीतही कोरोना लसीचा मुद्दा उपस्थित केला होता. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत, आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ग्लोबल अॅडव्हायजरी बोर्डाची बैठक घेतली. यावेळी नोबेल विजेते अभिजित बॅनर्जीही उपस्थित होते. गुजरात, यूपी आणि कर्नाटक या राज्यांना मुबलक प्रमाणात कोरोना लसी मिळाल्या आहेत. मी लोकांमध्ये भेदभाव करत नाही. पश्चिम बंगालला लोकसंख्येच्या घनतेनुसार कमी लसी मिळाल्या आहेत. मी केंद्र आणि पंतप्रधान मोदींना विनंती करते, की राज्या-राज्यांमध्ये भेदभाव करू नका, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.