नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. याच दरम्यान घोषवाक्य आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर हल्लाबोल केला जात आहे. याच दरम्यान मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचा (BJP) नेमका चेहरा कोण असणार? याची घोषणा करा असं टीएमसीकडून वारंवार म्हटलं जात आहे. यासोबतच टीएमसीने (TMC) भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. "बंगाल को अपनी बेटी चाहिए" असं म्हणत निशाणा साधला आहे. मात्र आता भाजपाने या वाक्याला जोरदार प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे.
टीएमसीवर हल्लाबोल करताना भाजपाने बंगाल भाजपामधील नऊ महिला नेत्यांचे फोटो ट्वीटरवरुन शेअर केले आहेत. सोबतच बंगालला आपली मुलगी हवी आहे, आत्या नाही, अशा शब्दात ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) सणसणीत टोला लगावला आहे. भाजपाने आपल्या पोस्टरमध्ये ममता यांना आत्या म्हटलं आहे. बंगाल निवडणुकीच्या अभियानाच्या सुरुवातीलाच टीएमसीने बंगालला आपली मुलगी हवी असल्याची घोषणा दिली होती. टीएमसी दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांना बाहेरचे असल्याचं म्हणलं आहे.
तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी राज्यातील लोकांना आपली मुलगी पाहिजे, जी गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्याच्या रुपात त्यांच्यासोबत आहेत. आम्हाला बंगालमध्ये बाहेरच्या कोणाला आणायचं नाही असं म्हटलं होतं. भाजपाने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये भाजप नेत्या देबोश्री चौधरी, लॉकेट चटर्जी, रूपा गांगुली, भारती घोष आणि अग्निमित्रा पॉल यांच्यासह काही महिला नेत्यांचे फोटो शेअर केले आहेत. भाजपाने या महिला नेत्यांना बंगालची मुलगी म्हटलं आहे.
भाजपाने बंगालमध्ये नेत्यांची पूर्ण फौजचं पाठवली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही रविवारी बंगालमध्ये सभा घेणार आहेत. ते 28 फेब्रुवारीला सकाळी कालीघाट मंदिर आणि दक्षिणेश्वर मंदिरात दर्शन घेणार आहेत. यानंतर धुलागोरीपासून हावडा साउथपर्यंत परिवर्तन रॅली काढली जाणार आहे. याठिकाणी ते सभा घेऊन जनतेला संबोधितही करणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भाजपाने (BJP) याआधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करुन ममतांवर टीकास्त्र सोडण्यात आलं होतं.
"ये बंगाल भाजपा है…और यहा उनकी Pawri हो रही है", TMC ने रिकाम्या खुर्च्यांवरुन लगावला सणसणीत टोला
प्रसिद्ध वेब सीरिज मनी हाइस्टचं थीम साँग 'बेला चाओ' (Bella ciao) च्या धर्तीवर बंगाली भाषेत ‘पिशी जाओ’ (आंटी जाओ) या गाण्याद्वारे ममता बॅनर्जींना लक्ष्य करण्यात आलं होतं. भाजपाने केलेल्या टीकेला आता तृणमुल काँग्रेसने (TMC) जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तृणमुलने सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत असलेल्या "Pawri ho rahi hai" ट्रेंडच्या आधारे भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच बंगालमधील भाजपाच्या जनसभेचा एक फोटो तृणमुलने आपल्या अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या सभेला केवळ एक व्यक्ती उपस्थित आहे तर इतर सर्व खुर्च्या रिकाम्या असलेल्या दिसत आहेत. स्टेजवरती भाषण देणाऱ्या नेत्यांचीच गर्दी आहे. फक्त एक माणूस खुर्चीवर बसला आणि अन्य सर्व खुर्च्या खाली आहेत. हा फोटो ट्विट करत तृणमुलने "ये भाजपा बंगाल है....ये उनकी जनसभा है...और यहा उनकी pawri (पार्टी) ho rahi hai!" असं म्हटलं आहे.