नवी दिल्ली – अमेरिकेत सुरू असलेल्या राड्यावरून आता भारतात काँग्रेस आणि भाजपा नेते एकमेकांना भिडले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिलवर गोंधळ घातला आणि सीनेटवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला. या हजारो आंदोलकांच्या गर्दीत भारताचा तिरंगा झेंडा फडकताना दिसल्याने सध्या सोशल मीडियात चर्चेला उधाण आलं आहे. यावरूनच आता भाजपाचे वरुण गांधी आणि काँग्रेसचे शशी थरूर यांच्यात ट्विटरवर वॉर रंगू लागलं आहे.
गुरूवारी भाजपा खासदार वरुण गांधी यांनी एक व्हिडीओ ट्विट करत म्हटलं की, कॅपिटल हिल हिंसक आंदोलनात भारताचा तिरंगा फडकताना दिसला, त्याठिकाणी भारतीय झेंडा का आहे? ही एक अशी लढाई आहे ज्यात भारताची कधीही त्यात भाग घेण्याची इच्छा नाही. वरुण गांधींच्या या ट्विटवर शशी थरूर यांनी उत्तर दिलं आहे, काही भारतीय डोनाल्ड ट्रम्प समर्थकांच्या मानसिकतेमध्ये आहेत. जे तिरंग्याचा सन्मान करण्याऐवजी एक हत्यार म्हणून त्याचा वापर करत आहेत. जे त्यांचे समर्थन करत नाहीत अशांना एंटी नॅशनल बोललं जातं. त्याठिकाणी दिसणारा झेंडा आपल्या सगळ्यांसाठीच एक इशारा आहे.
शशी थरूर यांच्या या ट्विटवरून पुन्हा वरुण गांधी यांनी म्हटलं की, आपली शान दाखवण्यासाठी तिरंगा फडकवणाऱ्या लोकांची खिल्ली उडवणं सध्या सोपं झालं आहे. त्याचसोबत चुकीच्या गोष्टींसाठी तिरंगा फडकवणेही सोपं झालं आहे. दुर्दैवाने काही पुरोगामी भारतीय भारतात एंटी नॅशनल आंदोलनात(जेएनयू) तिरंग्याचा वापर करण्याचा धोका दुर्लक्षित केला जातो. तिरंगा आमच्यासाठी गर्वाचे प्रतीक आहे, तिरंग्याचा सन्मान आम्ही कोणत्याही मानसिकतेशिवाय करतो असं वरुण गांधींनी सांगितले आहे.
याचवेळी शुक्रवारी वरुण गांधी यांनी एक फोटो पोस्ट करत आरोप केला आहे की, ट्रम्प समर्थकांच्या हिंसेत जो व्यक्ती तिरंगा फडकवत आहे तो शशी थरूर यांच्या ओळखीचा आहे. मात्र शशी थरूर यांनी उत्तर देताना सांगितले आहे की, जर तो माणूस ओळखीचा असेल तर त्याच्या कृत्याचे मी समर्थन करत नाही, जर तुमच्या ओळखीचं कोणी काहीही करेल तर त्यासाठी तुम्ही जबाबदार असाल का? असा सवालही शशी थरूर यांनी उपस्थित केला आहे.
फक्त वरुण गांधी आणि शशी थरूर यांनीच नव्हे तर अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही अमेरिकेत सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात तिरंगा फडकवणारा फोटो पाहून चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियात गुरुवारी हा व्हिडीओ चर्चेचा विषय राहिला आहे. गुरुवारी हजारोंच्या संख्येने डोनाल्ड ट्रम्प समर्थक कॅपिटल हिल येथे जमा झाले होते, त्यावेळी अनेकांनी सीनेटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तिथे तोडफोड करत कार्यालये ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नॅशनल गार्ड्सने त्यांना वेळीच बाहेर काढलं, या हिंसक आंदोलनात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत अशाप्रकारे झालेल्या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगातील अनेक नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे.