नाशिक : राज्यातील २५ लाख युवकांना संघटित करून युवा वॉरियर्स नेमणार - बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 12:00 PM2021-07-20T12:00:00+5:302021-07-20T12:01:56+5:30
Chandrashekhar Bawankule : भाजप हा संघटनात्मक बांधणी असलेला पक्ष असल्याचं बावनकुळे यांचं वक्तव्य. २०२४ च्या निवडणुकीत केंद्र आणि राज्यात भाजप मोठ्या ताकदीनं उभा राहणार असल्याचा बावनकुळे यांचा विश्वास.
राज्यातील २५ लाख युवकांना संघटित करून युवा वॉरिअर्स नेमणार असल्याची माहिती माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भाजप हा संघटनात्मक बांधणी असलेला पक्ष असून २०२४ च्या निवडणुकीत केंद्र आणि राज्यात भाजप मोठ्या ताकदीनं उभा राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बाववकुळे यांनी नाशिकमध्ये यावर वक्तव्य केलं.
"भाजप हा संघटनात्मक बांधणी असलेला पक्ष आहे. २०२४ च्या निवडणुकीत, केंद्र आणि राज्यात भाजप मोठ्या ताकदीनं उभा राहिल. राज्यातील २५ लाख युवकांना संघटित करून युवा वॉरिअर्स म्हणून नेमलं जाणार आहे. या अभियानात सर्व समाजाच्या युवकांची नोंदणी केली जाणार आहे," असं बावनकुळे म्हणाले.
ओबीसी समाजासा १९९७ मध्ये २७ टक्के आरक्षण देण्यात आलं होतं. आम्ही हायकोर्टात योग्य मांडणी केल्यानं कोर्टानं आमच्या बाजूनं निकाल दिला. याविरोधात काँग्रेस नेते सुप्रीम कोर्टात गेले. ३१ जुलै २०१९ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण टिकवल्याचंही त्यांनी नमूद केलं. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा अध्यादेश लॅप्स झाला. सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकारने बाजू मांडलीच नाही हे दुर्दैव आहे. राज्य सरकारने इम्पिरिअल डेटा तयार करा हे सुप्रीम कोर्टाचे निर्देश होते. विधानमंडळाचा गैरवापर करून केंद्रानं हा डेटा द्यावा हा बेकायदेशीर ठराव करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. महाविकास आघाडीत कोणीतरी झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यांना डिसेंबर २०२२ पर्यंत आरक्षण द्यायचं नाहीये, असंही त्यांनी नमूद केलं.