"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण
By प्रविण मरगळे | Published: September 27, 2020 10:20 PM2020-09-27T22:20:41+5:302020-09-27T22:24:57+5:30
फडणवीस आणि राऊत भेटीनंतर माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केला दावा
अहमदनगर – शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण भाजपाच्या संपर्कात असून थोड्याच दिवसात राज्यात भाजपाचं सरकार येणार असल्याचा दावा माजी मंत्री आणि भाजपा नेते शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. फडणवीस आणि राऊत यांची भेट झाल्यानंतर राज्यात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यातच कर्डिले यांनी हा दावा केल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
याबाबत शिवाजी कर्डिले म्हणाले की, केंद्रात भाजपाची सत्ता आहे, पण आता राज्यातही सत्ता येईल, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक जण संपर्कात आहेत. राज्यात भाजपाची सत्ता येणार असल्यानेच ते संपर्कात आहेत. थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल, त्याचसोबत अहमदनगरमध्येही अनेक पक्षाचे नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असल्याचं ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात झाली होती २ तास गुप्त बैठक
सांताक्रुझच्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये शनिवारी दुपारी १.३० ते ३.३० वाजता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाली होती. ग्रँड हयातमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी काय चर्चा केली याबाबत खुलासा झाला नव्हता. मात्र या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्याने काही हालचाली सुरु झाल्यात का? या चर्चेला उधाण आलं. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी एक शायरी ट्विट केली होती, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, "किसी भी रिश्ते को कितनी भी ख़ूबसूरती से क्यों ना बाँधा जाए...अगर नज़रों में इज़्ज़त और बोलने में लिहाज़ ना हो तो वह टूट जाता है" त्यामुळे संजय राऊत यांना नेमका कोणाबाबत हा संदेश द्यायचा आहे हा प्रश्न आहे. मात्र फडणवीस राऊत बैठकीने हे संकेत दिलेत का अशीही चर्चा आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
आमच्या भेटीमध्ये गोपनीय असे काही नव्हते. गोपनीय भेट म्हणायला आम्ही काही बंकरमध्ये तर भेटलेलो नाही. या भेटीत सामनातील मुलाखतीबाबत चर्चा झाली. बाकी गोपनीय म्हणायचं तर आम्ही गोपनीय पद्धतीनं भोजन केलं, असा चिमटा राऊत यांनी काढला. एकमेकांना न भेटायला आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक वाद होतात. पण वैयक्तिक वाद होत नाहीत. सत्ताधारी विरोधक भेटतच असतात. भाजपासोबत सत्तेत असताना मी शरद पवार यांना भेटायचो. आजही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले नेते मानतो, असे संजय राऊत म्हणाले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
शिवसेना नेते संजय राऊत यांना सामनासाठी माझी मुलाखत घ्यायची आहे. त्यांनी त्याबद्दल माझ्याकडे विचारणा केली. त्यावर मी जरूर मुलाखत देईन असं त्यांना म्हटलं. पण माझ्या काही अटी, शर्ती आहेत. मुलाखत घेताना तिथे माझाही कॅमेरा असेल, अशा माझ्या काही अटी, शर्टी आहेत. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी एकदा भेटून बोलू असं ठरलं होतं. त्याविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो घेतो, असं फडणवीस म्हणाले. भाजपला सत्ता स्थापनेची घाई नाही, हे सरकार स्वत:च्या कृतींमुळेच कोसळेल, या विधानांचाही त्यांनी पुनरुच्चार केला. 'संजय राऊत यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याबद्दल भाजपाची कुठलीही चर्चा नाही. तशी चर्चा करण्याचं कोणतंही कारण नाही. सरकारच्या कामाबद्दल जनतेच्या मनात आक्रोश आहे. विरोधी पक्ष म्हणून सरकारला धारेवर धरण्याचं काम आम्ही करत आहोत. हे सरकार आपल्या स्वत:च्या कृतीनं खाली कोसळेल. त्यावेळी काय करायचं ते तेव्हा बघू. सरकार स्थापनेची आम्हाला कुठलीही घाई नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
अपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार
बॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का? ज्योतिष्यांनी मांडली कुंडली
Video: खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंचे मोठं विधान; सर्व समाजाचे आरक्षण रद्द करा अन्...
“नेते जो आदेश देतील तो कार्यकर्ते पाळणार, राजकारणात कोणी मित्र नसतो किंवा दुश्मन नसतो”
...अन्यथा चौकाचौकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळू; धनगर समाजाची आक्रमक भूमिका
फडणवीस-राऊत भेटीनंतर राष्ट्रवादी अलर्ट; शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये तातडीची बैठक
‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू