काेलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वातावरण बदलताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेस साेडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेल्या नेत्यांनी घरवापसीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मनधरणी सुरू केली आहे. तर आता भाजपचे कार्यकर्ते लाऊडस्पीकरवरुन गावभर फिरून जनतेची माफी मागत आहेत.
पश्चिम बंगालच्या बीरभूम आणि हुगळी जिल्ह्यातील कार्यकर्ते लाऊडस्पीकरवरुन सार्वजनिक माफीनामा मागत आहेत. भाजप फ्राॅड पक्ष असून पक्षाला ओळखण्यात चूक केली. आम्हाला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा आहे, असे हे कार्यकर्ते सांगत सुटले आहेत.
कार्यकर्ते तृणमूलमध्येबीरभूम जिल्ह्यातील सैंथिया येथे सुमारे ३०० भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. धनियाखली येथे भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांची जाहीर माफी मागितल्यानंतरच त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला.
पदाधिकाऱ्यांचे राजीनामेभाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल राॅय यांनी तृणमूलमध्ये घरवापसी केल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांनीही याच मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर आमदार बिश्वजीत दास यांनी पक्षाच्या बैठकीला गैरहजेरी लावली.