नवी दिल्ली
नवे कृषी कायदे आणल्यानंतरही देशातील शेतकरी मोदी सरकारसोबत असल्याचं विधान भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरुन संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
संबित पात्रा यांनी यावेळी गोवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या निकालांचा संदर्भ दिला. "कृषी कायदे जाहीर केल्यानंतर झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळालं आहे. कारण मोदींनी देशातील गरीब आणि शेतकरी वर्गाचं नेहमी हीत पाहिलं आहे. राहुल गांधींना फक्त ट्विट करता येतं. पण त्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत काहीच कळत नाही हे वास्तव आहे", असं संबित पात्रा म्हणाले.
"गोवा जिल्हा परिषदेचे निकाल देखील हाती आले आहेत. बिहार विधानसभेपासून ते आतापर्यंत लागलेल्या सर्व निवडणुकांच्या निकालांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. देशातील शेतकरी जर मोदींसोबत नसता तर इतकं यश मिळालं असतं का?", असा सवाल संबित पात्रा यांनी यावेळी उपस्थित केला.
"शेतकरी आंदोलनाला कोण हायजॅक करू पाहातंय हे सर्वांना माहित आहे. माध्यमांमध्ये सारंकाही दाखवलं जात आहे आणि आपण काही लोकांना पंतप्रधान मोदींविरोधात अभद्र भाषेत टीका करताना देखील पाहिलं आहे", असा आरोप संबित यांनी केला आहे.
आसाम, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, गोवा येथील सर्वच स्थानिक आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळालं आहे. "गाव, गरीब, किसान आणि मजूर हे देशाचा कणा आहेत. हे जर केंद्र सरकारसोबत नसते तर आज निवडणुकांचे निकाल वेगळे असते. मणिपूरपासून कच्छपर्यंत १२ राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. कोरोना, प्रवासी मजूर, कृषी कायदे आणि आर्थिक संकट या चार मुद्द्यांवरुन विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. पण आत्मनिर्भर भारताचा विजय झाला आहे. देशातील ८० कोटी गरीब जनतेपर्यंत धान्य पुरवण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे", असं संबित पात्रा म्हणाले.