BJP Withdraws candidate name : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा अखेर खऱ्या ठरल्या. भाजपने सिरसा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मागे घेतला. रोहतास जांगडा यांना भाजपने या मतदारसंघातून तिकीट दिले होते. पण, रणनीती बदलत भाजपने आता उमेदवार मागे घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप कुणाला पाठिंबा देणार, हे स्पष्ट झाले आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपने ही खेळी केली आहे. भाजपाने आता सिरसा मतदारसंघात लोकहित पार्टीचे उमेदवार गोपाल कांडा यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा आणि लोकहित पार्टीमध्ये झालेल्या ठरावानुसार गोपाल कांडा रानिया विधानसभा मतदारसंघातील पक्षाचा उमेदवार मागे घेणार आहेत.
भाजपाचे ८९ उमेदवार रिंगणात
भाजपाने हरियाणा विधानसभा निवडणुकीत ९० जागांवर उमेदवार उतरवले होते. आता, एक उमेदवार मागे घेतल्याने भाजपाचे ८९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
सोमवारी (१६ सप्टेंबर) पक्षाची गोपनीय बैठक झाली. या बैठकीनंतर सिरसातील रोहतास जांगडा यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार जांगडा यांनी अर्ज मागे घेतला. पक्षाच्या निर्णयाचा आदर करत अर्ज मागे घेतल्याचे रोहतास जांगडा म्हणाले.
भाजपा नेत्याने अपक्ष भरला अर्ज, पण...
सिरसातील भाजपाचे नेते गोबिंद कांडा यांनी फतेहाबाद मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. छाननी दरम्यान गोबिंद कांडासह आठ जणांचे अर्ज बाद झाले. गोबिंद कांडा यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल न करता आपल्या लीगल टीमला पाठवले होते. निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांनी स्वतः शपथपत्र घेणे आवश्यक होते, पण ते गेलेच नाहीत.